उल्हासनगर : उल्हासनगरातील महिला बालसुधारगृहातून थरारक पळ काढणाऱ्या सहा मुलींमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तातडीच्या शोधमोहिमेत दोन मुलींचा शोध लागताच या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून उर्वरित चौघींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून प्रयत्न करत आहे.
उल्हासनगरात तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महिला बालसुधारगृहातून तब्बल सहा मुली पळाल्याची घटना समोर आली आहे. कॅम्प क्रमांक ५ मधील या बालसुधारगृहात अनाथ, भिक्षेकरी तसेच गरज असलेल्या मुलींना आश्रय दिला जातो. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था येथे केली जाते. मात्र गुरुवारी या सहा मुलींनी संधी साधून पळ काढला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोन मुलींना शोधण्यात यश मिळवले. या दोघींनी चौकशीत 'आम्हाला येथे राहायचे नव्हते म्हणून पळालो,' असे सांगितल्याचे समजते.
या संपूर्ण कारवाईची माहिती देताना परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनेची पुष्टी केली. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित चार मुलींचा कसून शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.