उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘महायुती’चा विषय जितका चर्चेत आहे, तितकाच तो अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. एका बाजूला शिवसेना-टीओके-साई यांची स्थानिक युती भक्कम होत असताना, दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रवेशामुळे ७८ जागांच्या गणितात मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. जागावाटप, संख्याबळ आणि संभाव्य बंडखोरी या तिन्ही आघाड्यांवर महायुतीसमोर आव्हाने उभी ठाकली आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे गणित दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत आहे. शहरात आधीच शिवसेना, टीओके आणि साई या स्थानिक घटक पक्षांची युती झालेली असून, या आघाडीने अधिकाधिक जागांवर ठाम दावा केला आहे. अशा परिस्थितीत या युतीत भाजपचा समावेश झाल्यास जागावाटप करताना सर्वच पक्षांसमोर कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत.
एकूण ७८ जागांच्या महापालिकेत सध्या शिवसेना-टीओके-साई युतीकडे तब्बल ५८ विद्यमान नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय भाजपचे चार विद्यमान नगरसेवकही शिवसेना-टीओके गटात सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपसाठी अवघ्या १६ जागा शिल्लक राहण्याची शक्यता असून, हे गणित भाजपला मान्य होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
या भूमिकेमुळे स्थानिक घटक पक्ष आणि भाजप यांच्यातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे संख्याबळाच्या आधारे स्थानिक युती अधिक जागांवर ठाम आहे, तर दुसरीकडे भाजप संघटनशक्ती आणि टक्केवारीच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसत आहे.
परिणामी, उल्हासनगरमधील महायुतीचा निर्णय हा केवळ औपचारिक न राहता, आगामी निवडणूक रणनीती ठरवणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. महायुतीचा तोडगा निघतो की स्वतंत्र लढतींचे चित्र स्पष्ट होते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
महायुती झालीच तर भाजपकडून ४२ ते ५० टक्के जागांची ठाम मागणी केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीत सहभागी झाल्यास आम्ही किमान ४२ ते ५० टक्के जागांचा प्रस्ताव ठेवू. हा प्रस्ताव मान्य न झाल्यास महायुती शक्य नाही.
कुमार आयलानी, आमदार भाजप