उल्हासनगरमध्ये महायुतीत फूट; भाजप ७८ जागांवर स्वबळावर

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारी घोषणा समोर आली आहे. आतापर्यंत महायुतीच्या चर्चेत अडकलेले राजकीय गणित अचानक कोलमडले असून, भारतीय जनता पक्ष आता उल्हासनगरमध्ये स्वतंत्र्य निवडणूक लढवणार असल्याची खळबळजनक घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केली आहे.
उल्हासनगरमध्ये महायुतीत फूट; भाजप ७८ जागांवर स्वबळावर
(संग्रहित छायाचित्र)
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारी घोषणा समोर आली आहे. आतापर्यंत महायुतीच्या चर्चेत अडकलेले राजकीय गणित अचानक कोलमडले असून, भारतीय जनता पक्ष आता उल्हासनगरमध्ये स्वतंत्र्य निवडणूक लढवणार असल्याची खळबळजनक घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केली आहे. ‘शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही,’ असा थेट आरोप करत वधारियांनी महायुतीत फूट पडल्यावर शिक्कामोर्तब केले.

पत्रकारांशी बोलताना राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले की, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. महायुतीबाबत अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे भाजप नव्या सामाजिक व राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणूक केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भविष्यातील शहराच्या राजकीय दिशेचा फैसला करणारी निर्णायक लढाई ठरत आहे. भाजपचा स्वबळाचा निर्णय आणि शिंदे गट-टीओके-साई यांची स्वतंत्र आघाडीमुळे मतदारांसमोर अनेक पर्याय खुले झाले असून, या राजकीय रणांगणात अंतिम बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

जागावाटपात भाजपला विश्वासात घेतले नाही

शिवसेनेने युतीधर्म पाळला नाहीं, तसेच महायुतीत अपेक्षित समन्वय साधला गेला नाही, तसेच जागावाटप आणि निर्णय प्रक्रियेत भाजपला विश्वासात घेण्यात आले नाही. “युती म्हणजे केवळ घोषणाच नव्हे, तर परस्पर सन्मान आणि संवाद आवश्यक असतो. तो झाला नाही,” असे सूचक विधान करत त्यांनी भाजपच्या स्वबळाच्या निर्णयामागची भूमिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केली.

शिंदे गट-टीओके-साई यांचे ‘दोस्तीचे गठबंधन’ कायम

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), टीम ओमी कलानी आणि साई पार्टी यांचे स्थानिक पातळीवरील ‘दोस्तीचे गठबंधन’ कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, भाजप विरोधात स्वतंत्र आणि मजबूत आघाडी उभारण्याची तयारी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in