

उल्हासनगर : हाजीमलंगवाडी येथील श्री पीर हाजीमलंग साहिब दर्गा उरूसानिमित्त लाखो भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पालखी व संदलाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी, यंदा सुरू झालेली फ्युनिक्युलर रोप-वे सेवा आणि मलंगगडाची मर्यादित क्षमता विचारात घेऊन २ फेब्रुवारी रोजी रोप-वे सेवा व वाहतुकीवर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी केले आहे.
हाजीमलंगवाडी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री पीर हाजीमलंग साहिब दर्ग्याचा उरूस, संदल व पालखी सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील मुख्य कार्यक्रम २ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत होणार असून, त्या दिवशी मलंगगड व पायथ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
यंदा नव्याने सुरू झालेल्या फ्युनिक्युलर रोप-वे सेवेच्या पार्श्वभूमीवर गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र, मलंगगडावर एकावेळी केवळ ८ ते १० हजार भाविकांचीच क्षमता असल्याने गर्दी नियंत्रणासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
निर्बंधांचे स्वरूप पुढीलप्रमाणे
२ फेब्रुवारी रोजी गडावर जाण्यासाठी रोप-वे सेवा सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेतच सुरू राहील. सायंकाळी ४ नंतर गडावर जाण्यास बंदी राहील; मात्र खाली उतरण्यासाठी रोप-वे सेवा पुढील तीन तास सुरू ठेवली जाईल. वावंजे गावाकडून मलंगगडकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्यात येणार आहे. पायथ्याशी नियोजित वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून, तेथून भाविकांसाठी विशेष बससेवा उपलब्ध राहील. जोशी बाग परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळता) प्रवेशबंदी लागू असेल. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
हाजीमलंगगड उरूस हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. लाखो भाविक सुरक्षितपणे दर्शन घेऊ शकतील यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मलंगगडाची मर्यादित क्षमता, पालखीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी आणि यंदा सुरू झालेली रोप-वे सेवा लक्षात घेता काही काळासाठी निर्बंध लावणे आवश्यक होते. भाविकांच्या जीवित आणि वित्तीय सुरक्षिततेलाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास हा उरूस शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडेल.
सचिन गोरे, पोलीस उपायुक्त, उल्हासनगर
४० गावांत धर्मजागरणाचा गजर
ठाणे : जया एकादशीच्या निमित्ताने श्री मलंगगड विभागातील सुमारे ४० गावांमध्ये एकाच वेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी महाआरती तसेच येत्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीचे आवाहन केले होते. २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.