Ulhasnagar News : रागाच्या भरात दोन अल्पवयीन मुलांना टोचले गुरांचे इंजेक्शन; गुन्हा दाखल

मानवी संवेदना सुन्न करणारी आणि पालकांच्या सुरक्षाभावनेला धक्का देणारी अशी एक धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना गुरांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची सुई टोचल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रसौजन्य X (@sanskari_SM0)
Published on

मानवी संवेदना सुन्न करणारी आणि पालकांच्या सुरक्षाभावनेला धक्का देणारी अशी एक धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना गुरांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची सुई टोचल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुलांना घाबरवून हाकलण्यासाठी आरोपीने केलेले कृत्य अमानवी व भयकारी असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता उल्हासनगर-२ येथील कुंजबिहारी तबेला समोर, आझादनगर, शिवमंदिराजवळील रामभाऊ म्हाळगी चौक परिसरात घडली. या ठिकाणी धैर्य मुकेश गुप्ता आणि त्याचा मित्र युवराज विजय शर्मा (१२) हे दोघे रस्त्यावर उभे होते.

दरम्यान, अज्ञात कारणावरून संतापलेल्या आरोपी कन्हैया कुंजबिहारी यादव उर्फ शिवा यांनी आपल्या हातात असलेली गुरांसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शनची सुई निष्काळजीपणे दोन्ही मुलांच्या कमरेखाली टोचली. अचानक झालेल्या या हल्ल्याने मुले घाबरून गेली आणि त्यांना तत्काळ आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले.

प्राण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची सुई मानवी शरीरासाठी गंभीर दुष्परिणाम करू शकते, त्यामुळे मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये संताप पसरला असून दोषींवर कठोर आणि तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. फिर्यादी मुकेश गुप्ता यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी कन्हैया कुंजबिहारी यादव उर्फ शिवा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अहवाल मुलांवर वापरलेल्या इंजेक्शनच्या संभाव्य परिणामांचा ठराव करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in