उल्हासनगर : उल्हासनगरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षांमध्ये आता ‘कुठे जायचंय?’, ‘बसा साहेब’, ‘सुट्टे आहेत का?’ असा मराठी संवाद अधिक सहजपणे ऐकू येणार आहे. ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमातून तब्बल ९०० हून अधिक अमराठी रिक्षाचालकांनी मराठी बोलण्याचे आणि समजून घेण्याचे प्रशिक्षण पूर्ण करत भाषिक सलोख्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. प्रशिक्षणानंतर त्यांच्या मेहनतीची पावती प्रमाणपत्राच्या रूपाने देत गौरव करण्यात आला.
रमाकांत चव्हाण रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदर सिंह भुल्लर यांच्या पुढाकारातून सुमारे १८ बॅचमध्ये ९०० हून अधिक अमराठी रिक्षाचालकांनी मराठी बोलण्याचे आणि समजून घेण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, सभागृह नेते अरुण अशान, राजेंद्र चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, रिक्षाचालक उपस्थित होते.
मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान
‘अमराठी भाषकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले.
धावपळीतून वेळ काढत मराठी आत्मसात
प्रशिक्षणासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल रमाकांत चव्हाण रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर यांचे रिक्षाचालकांनी आभार मानले. प्रशिक्षकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दिवसभराच्या धावपळीतून वेळ काढत मराठी आत्मसात करणाऱ्या रिक्षाचालकांचे मान्यवरांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रसार होण्याबरोबरच प्रवासी-रिक्षाचालकांमधील संवाद अधिक सुसंवादी होऊन उल्हासनगरच्या बहुभाषिक संस्कृतीत भाषिक सलोखा अधिक दृढ होणार आहे.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राची अस्मिता आणि माणसांना जोडणारा दुवा आहे. उल्हासनगरातील ९०० हून अधिक अमराठी रिक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे मराठी शिकणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रवाशांशी आपुलकीने मराठीत संवाद साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून भविष्यातही अधिकाधिक अमराठी बांधवांना मराठीशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- हरजिंदरसिंह भुल्लर, अध्यक्ष-रमाकांत चव्हाण रिक्षाचालक-मालक संघटना