शहिदांच्या स्मारकांवर पक्षीय झेंड्यांचा कब्जा? उल्हासनगरातील चबुतरे राजकीय स्वार्थाच्या विळख्यात

शूरवीर, महामानव आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मारके आणि चबुतरे आज राजकीय स्वार्थाच्या विळख्यात सापडल्याचे विदारक चित्र उल्हासनगरमध्ये समोर आले आहे.
शहिदांच्या स्मारकांवर पक्षीय झेंड्यांचा कब्जा? उल्हासनगरातील चबुतरे राजकीय स्वार्थाच्या विळख्यात
Published on

उल्हासनगर : शूरवीर, महामानव आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मारके आणि चबुतरे आज राजकीय स्वार्थाच्या विळख्यात सापडल्याचे विदारक चित्र उल्हासनगरमध्ये समोर आले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मतांसाठी सर्व मर्यादा ओलांडत काही राजकीय नेत्यांनी थेट या पवित्र स्मारकांवर पक्षीय झेंडे, बॅनर व पट्टे लावून त्यांचे विद्रूपीकरण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

शहीद जवान, शूरवीर आणि महामानव हे कोणत्याही एका पक्षाचे नसून ते संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान आहेत. मात्र, उल्हासनगर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पवित्र स्मारकांचा पक्षीय प्रचारासाठी सर्रास वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध चौकांतील चबुतऱ्यांवर थेट राजकीय पक्षांचे झेंडे व पट्टे बांधून त्यांना पक्षीय रंग देण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

विशेष म्हणजे, जयंती अथवा पुण्यतिथीच्या दिवशी हेच राजकीय नेते मोठ्या थाटामाटात चबुतऱ्याची साफसफाई करतात, हार अर्पण करतात, फोटो व व्हिडीओ काढून सोशल मीडियावर स्वतःची प्रतिमा उजळवतात. मात्र, निवडणुका जवळ येताच याच स्मारकांचा थेट पक्षीय प्रसिद्धीसाठी वापर केला जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील व्हीटीसी ग्राऊंडसमोरील शहीद अमर जवान चौक येथील चबुतऱ्यावर विविध राजकीय पक्षांचे झेंडे व पट्टे लावून स्मारकाला अक्षरशः विळखा घालण्यात आला आहे. याच परिसरातील स्वर्गीय रमेश केणे चौक येथील चबुतराही राजकीय झेंड्यांनी झाकण्यात आला असून, गोल मैदान परिसरातील चबुतऱ्यावरही असाच प्रकार निदर्शनास आला आहे.

या प्रकारामुळे शहीद जवानांच्या स्मृतींचा अपमान होत असल्याची तीव्र भावना नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. शहीद जवान आणि महामानव हे मतांसाठी वापरण्याची वस्तू नाहीत. त्यांच्या स्मारकांवर पक्षीय झेंडे लावणे म्हणजे त्यांच्या बलिदानाला तडा देण्यासारखे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आंदोलनाचा इशारा

दरम्यान, राजकीय नेते खरोखरच महामानवांचा सन्मान करणार की केवळ निवडणुकीपुरते त्यांचे नाव वापरणार, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. तसेच महापालिका प्रशासन या चबुतऱ्यांवरील पक्षीय झेंडे व पट्टे तत्काळ उतरवून कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in