उल्हासनगर : उल्हासनगरच्या सत्ताकेंद्राकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच मंत्रालयातून आलेल्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी सकाळी मंत्रालयातील सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीत उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौरपद नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे जाहीर झाले. या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून महापौरपदाच्या शर्यतीला अधिकृत रंग चढला आहे.
शिंदे गटात उत्साहाचे वातावरण
महानगरपालिकेतील विद्यमान संख्याबळ आणि सत्तास्थिती पाहता शिवसेना (शिंदे गट) चाच महापौर होण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. त्यामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण असून संभाव्य दावेदारांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि वरिष्ठ पातळीवरील हालचालींमुळे महापौरपदाची शर्यत अधिकच रंजक बनली आहे.
महापौरपदावर महिला नेतृत्व?
यंदा उल्हासनगर महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये ७८ जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग (OBC) साठी २१ जागा आरक्षित होत्या. विशेष म्हणजे या २१ जागांपैकी ११ जागांवर महिला नगरसेविका निवडून आल्या असून, त्यामुळे यंदा महापौरपदावर महिला नेतृत्वाचीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
'या' नावांची जोरदार चर्चा
महापौर पद OBC साठी राखीव झाल्यानंतर शिंदे गटाकडून जे संभाव्य दावेदार पुढे आले आहेत, त्यामध्ये राजश्री चौधरी, इंदिरा पाटील, ज्योत्स्ना जाधव, अश्विनी निकम, डिंपल ठाकूर, वंदना भदाणे, राजेश चांपूर, दिलीप जग्यासी आणि विकी लबाना यांचा समावेश आहे. या सर्व नावांभोवती सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, महापौरपद OBC साठी राखीव झाल्याने विरोधी पक्षांची गणिते बऱ्यापैकी मर्यादित झाली आहेत. त्यामुळे आता खरी लढत ही शिवसेना (शिंदे गट) अंतर्गतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, यावरच उल्हासनगरच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराची दिशा ठरणार आहे. येत्या काही दिवसांत महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार असून, त्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.