उल्हासनगर पालिकेच्या बसेस धावणार; २० पैकी पाच बसेस ताफ्यात जमा

पालिकेची स्वत:ची बससेवा उपलब्ध नसल्यामुळे आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली होती.
उल्हासनगर पालिकेच्या बसेस धावणार; २० पैकी पाच बसेस ताफ्यात जमा

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा, सिंधू भवन तसेच विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पालिकेची स्वत:ची बससेवा उपलब्ध नसल्यामुळे आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी पालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत त्याला प्रत्यक्षात उतरविला. पालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून २० बसेसकरिता ही प्रक्रिया राबविण्यात येत असून सध्या पालिकेच्या ताफ्यात पाच बसेसचा समावेश झाला आहे. आता पालिकेची स्वत:ची बस उल्हासनगर शहरात धावणार असल्याने नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

महानगरपालिकेच्या बस डेपोचे बांधकाम आणि चार्जिंग स्टेशनचे बांधकाम केंद्र शासनाने २३ कोटीचा निधी मंजूर केला आहे. बस सेवा सुरू करण्यासाठी चार्जिंग सेशन व डेपो निर्माण करण्यात आलेला आहे. कंडक्टर यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. कंडक्टर यांना तिकीट काढण्यासाठी येस बँकमार्फत मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनचालक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच शहरामध्ये बस थांबे बनवण्याकरिता स्वतंत्र एजन्सीची स्थापना करण्यात आलेली असल्यामुळे बस थांबे सुद्धा शहरात जागोजागी नव्याने उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाची प्रधान मंत्री ई-बस योजना सुरू झाली आणि या योजनेंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेस १०० ई-बसेस मिळणार आहेत. तत्कालीन आमदार, ज्योती कलानी यांनी सदर सिंधू भवनाची संकल्पना सर्वात प्रथम आखली व याविषयीची पायाभरणी ज्योती कलानी यांनीच केली आहे, असे माजी महापौर पंचम कलानी यांनी सांगितले. सदर सिंधू भवनाचा लाभ येथील सर्व धर्मीय गोर गरीब जनतेस होईल, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आयुक्त अजिज शेख, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

९ मीटरच्या बसेसचा समावेश

प्रशासनामार्फत इन्कम निधी अंतर्गत बससेवा सुरू करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या निविदा प्रक्रियेमध्ये पिनॅकल मोबिलिटी या कंपनीची निवड करण्यात आली होती. एकूण २० बसेसकरिता ही प्रक्रिया राबविण्यात आली. २० बसेसमध्ये ९ मीटरच्या दहा नॉन एसी आणि १२ मीटरच्या दहा एसी बसेस उपलब्ध होणार आहेत. सध्या पालिकेच्या ताफ्यात पाच बसेसचा समावेश करण्यात आला आहे.

सिंधू भवनची स्थापना

उल्हासनगर कॅम्प नंबर ३ सपना गार्डनजवळील सिंधू भवनचे बांधकाम महानगरपालिका निधीमधून पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाची किमत रुपये ४.६१ कोटी इतकी आहे. मे. सतीश कन्स्ट्रक्शन यांचे नावे कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले होते. सदर काम पूर्ण करण्यात आले आहे. सदर बांधकाम तळमजला + दोन मजले असे आहे. दुसऱ्या मजल्यावर ३०० बैठकीचे सभागृह आहे. या ठिकाणी विविध नाटकांचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तळमजला व पहिल्या मजल्यावर ३७० चौ. मीटरचे भव्य सभागृह आहे.

"उल्हासनगर शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारती यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी उल्हासनगर शहरासाठी वेगळा यूडीसीपीआर मंजूर केला असून, याचा फायदा उल्हासनगर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना होईल." - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

logo
marathi.freepressjournal.in