

उल्हासनगर : आठ महिन्यांपासून रखडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. २४ सप्टेंबर रोजी होणारी निवड अवघ्या काही तासांवर असतानाच न्यायालयीन घडामोडींमुळे ही प्रक्रिया आणखी तीन दिवस पुढे ढकलली गेली आहे. महापौरांच्या वतीने निवडणुकीसाठी सात दिवसांची मुदत मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाकडून तीन दिवसांचीच मुदत मिळाल्याने आता २८ सप्टेंबरच्या नव्या मुहूर्ताकडे ४२ इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून राजकीय आणि न्यायालयीन पेचात अडकलेल्या सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींमुळे निवड प्रक्रिया पुढे जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. महापौरांच्या वकिलांनी निवडणुकीसाठी सात दिवसांची मुदत मागितली होती. मात्र न्यायालयाने तीन दिवसांची मुदत दिल्याने आता २८ सप्टेंबर रोजी निवड होईल, असे वधारिया यांनी सांगितले.
जानेवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड अपेक्षित होती. मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया सातत्याने रखडली. सप्टेंबरमध्ये निवड प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी विशेष महासभा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. त्याविरोधात भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन आदेशानंतर प्रशासनाने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष महासभा बोलावली होती.
नगरसेवकांमध्ये उत्सुकता कायम
तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय चुरस वाढली आहे. भाजपकडून धनंजय बोडारे, राजेंद्र (बाळा) श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेनेच्या तीन जागांसाठी मात्र इच्छुकांची मोठी संख्या असल्याने पक्षाकडून कोणाची निवड केली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. महापौरांसह विक्की लबाना आणि पूजा भोईर यांच्या अन्य दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.