उल्हासनगर : थकीत वेतनाच्या प्रश्नावरून उल्हासनगर महापालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वेतन रखडण्यामागे आर्थिक अडचण नसून, मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) मधील उपस्थिती नोंदींतील त्रुटी आणि ‘झिरो अटेंडन्स’ ही प्रमुख कारणे असल्याचा दावा उल्हासनगर महानगरपालिकेने केला आहे. तसेच वेतनाशी संबंधित सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र HRMS हेल्प डेस्क कार्यरत असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केल्यानंतर महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धिपत्रक जारी केले. त्यानुसार, महानगरपालिकेत मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन उपस्थितीच्या नोंदींच्या आधारे तयार करून अदा केले जात आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीतील उपस्थितीच्या नोंदींनुसार तयार केले जात आहे. ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी किंवा उपस्थितीतील विसंगती आढळली आहे, त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र हेल्प डेस्क कार्यरत आहे. पात्र कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त
स्वतंत्र HRMS हेल्प डेस्क सुरू
महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र HRMS हेल्प डेस्क सुरू करण्यात आला असून, वेतन, उपस्थिती किंवा प्रणालीतील कोणतीही त्रुटी असल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तेथे संपर्क साधावा. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे तातडीने आणि नियमानुसार निराकरण करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.