उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय पटावर शुक्रवारी निर्णायक घडामोडी घडल्या. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तब्बल १८९ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने अनेक प्रभागांतील निवडणुकीचे गणित एका झटक्यात बदलले. काही प्रभागांमध्ये थेट लढती स्पष्ट झाल्या, तर काही ठिकाणी राजकीय तडजोडी आणि अंतर्गत समज-तडजोडींच्या चर्चांना उधाण आले. या माघारीनंतर आता ४३२ उमेदवार अंतिम निवडणूक रिंगणात उतरले असून, यंदाची उल्हासनगर महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील २० प्रभागांमधील ७८ जागांसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात एकूण ७०२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी छाननीनंतर ६७४ अर्ज वैध, तर २८ अर्ज अवैध ठरविण्यात आले.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. १८९ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ४३२ अंतिम उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
या माघारींमुळे काही प्रभागांमध्ये एकास एक लढती निश्चित झाल्या असून, काही ठिकाणी अजूनही बहुरंगी लढती कायम आहेत. अंतिम उमेदवार निश्चित झाल्याने आता प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे. प्रभागनिहाय रणनीती, मतांचे गणित आणि आघाड्यांची समीकरणे पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होणार असून, यंदाची उल्हासनगर महापालिका निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
उल्हासनगर महापालिका निवडणूक : संक्षिप्त आकडेवारी
एकूण प्रभाग : २०
एकूण जागा : ७८
एकूण दाखल अर्ज : ७०२
वैध अर्ज : ६७४
अवैध अर्ज : २८
माघार घेतलेले उमेदवार : १८९
अंतिम उमेदवार : ४३२