स्कॅनरवर काळे कापड, ग्राहकांची ATM कडे धाव; उल्हासनगरात UPI बंदमुळे खरेदीचा खोळंबा

खरेदी केल्यानंतर ग्राहकाने मोबाईल पुढे केला; मात्र स्कॅनरवर काळे कापड आणि दुकानदारांकडून ‘आज फक्त रोख रक्कम स्वीकारली जाणार!’ असे उत्तर मिळाल्याने अनेक ग्राहकांची तारांबळ उडाली. प्रस्तावित एमडीआर शुल्काच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पाळलेल्या ‘नो यूपीआय डे’मुळे अनेक ग्राहकांना खरेदी थांबवून एटीएम गाठावे लागले.
स्कॅनरवर काळे कापड, ग्राहकांची ATM कडे धाव; उल्हासनगरात UPI बंदमुळे खरेदीचा खोळंबा
स्कॅनरवर काळे कापड, ग्राहकांची ATM कडे धाव; उल्हासनगरात UPI बंदमुळे खरेदीचा खोळंबा
Published on: 

उल्हासनगर : खरेदी केल्यानंतर ग्राहकाने मोबाईल पुढे केला; मात्र स्कॅनरवर काळे कापड आणि दुकानदारांकडून ‘आज फक्त रोख रक्कम स्वीकारली जाणार!’ असे उत्तर मिळाल्याने अनेक ग्राहकांची तारांबळ उडाली. प्रस्तावित एमडीआर शुल्काच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पाळलेल्या ‘नो यूपीआय डे’मुळे अनेक ग्राहकांना खरेदी थांबवून एटीएम गाठावे लागले. व्यापाऱ्यांचा निषेध ठळकपणे उमटला; मात्र रोख रक्कम नसलेल्या ग्राहकांच्या दैनंदिन खरेदीचा खोळंबा झाला.

दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर प्रस्तावित ०.४ टक्के एमडीआर शुल्काला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार, उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानांमधील यूपीआय स्कॅनर काळ्या कापडाने झाकून निषेध नोंदवला. डिजिटल पेमेंटची सवय झाल्याने अनेक ग्राहकांकडे पुरेशी रोख रक्कम नव्हती. दुकानदारांकडून यूपीआय स्वीकारण्यास नकार मिळाल्यानंतर त्यांना खरेदी थांबवून एटीएम शोधावे लागले. पैसे काढून पुन्हा दुकानात परतण्याच्या धावपळीत ग्राहकांचा वेळ वाया गेला.

ग्राहकांमध्ये मतभिन्नता

या आंदोलनाबाबत ग्राहकांमध्येही मतभिन्नता दिसून आली. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन आता व्यापाऱ्यांवर आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे सांगत काही ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तर सरकारविरोधातील आंदोलनात ग्राहकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल काही ग्राहकांनी उपस्थित केला.

१५ ऑक्टोबरपासून शुल्क लागू करण्याचा दावा

१५ ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे. या शुल्कामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्याने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली. शहरातील व्यापाऱ्यांनी ‘नो यूपीआय डे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, व्यापाऱ्यांचा निषेध आणि त्याचवेळी ग्राहकांना झालेली गैरसोय, हे दोन्ही मुद्दे या आंदोलनातून समोर आले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in