एक दिवसात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात; दिव्यांगांसाठी उल्हासनगरमध्ये अभिनव उपक्रम

दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांचे आणि रुग्णालयांचे फेरे मारावे लागतात. मात्र आता ही त्रासदायक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे दिव्यांगांना एकाच दिवशी त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह दिव्यांग प्रमाणपत्र मिळत आहे.
एक दिवसात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात; दिव्यांगांसाठी उल्हासनगरमध्ये अभिनव उपक्रम
Published on

उल्हासनगर : दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांचे आणि रुग्णालयांचे फेरे मारावे लागतात. मात्र आता ही त्रासदायक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे दिव्यांगांना एकाच दिवशी त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह दिव्यांग प्रमाणपत्र मिळत आहे.

ही संकल्पना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या पुढाकाराने राबवली जात असून, या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे दिव्यांगांना वेळ व पैशाची बचत करत तत्काळ सेवा देणे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या नागरिकांचे कागदपत्रे योग्य असल्यास त्याच दिवशी त्यांच्या हाती अधिकृत प्रमाणपत्र सोपवले जाते. गेल्या बुधवारच्या शिबिरात एकूण ८९ दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामुळे या नागरिकांना शासकीय योजना, आरक्षण, आरोग्य सेवा, प्रवास सवलती यासारख्या विविध सुविधा सहज मिळणार आहेत. या शिबिरासाठी रुग्णालयात स्वतंत्र काऊंटर, वैद्यकीय टीम आणि नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नागरिकांना विनाकपात सेवा देण्यासाठी सर्व पथक संवेदनशीलतेने काम करत आहे.

अपंग संस्था अध्यक्ष अशोक भोईर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, डॉ. मनोहर बनसोडे यांनी या सेवेला केवळ वैद्यकीय काम म्हणून न पाहता सामाजिक दायित्व म्हणून हाताळले. त्यांच्या प्रेरणेमुळे संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या गरजांना प्राधान्य देऊन काम केलं आहे.

या उपक्रमामुळे उल्हासनगरमधील दिव्यांगांना नवा आशेचा किरण दिसत असून, ही योजना इतर शहरांनीही अनुकरण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या संवेदनशील आणि परिणामकारक पावलामुळे दिव्यांगांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे.

दिव्यांग बांधवांसाठी सेवा ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे, प्रमाणपत्रासाठी अनेक वेळा लोकांना महिनोन‌्महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यात वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढतो. म्हणूनच आम्ही ठरवले की या प्रक्रियेला अधिक सोपे, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करणे गरजेचं आहे. दर बुधवारी होणाऱ्या शिबिरातून एकाच दिवशी प्रमाणपत्र देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची टीम संवेदनशीलतेने आणि समर्पितपणे या सेवा पोहोचवते, हीच खरी आमची यशाची कहाणी आहे.

- डॉ. मनोहर बनसोडे, जिल्हा शल्यचिकित्सक

logo
marathi.freepressjournal.in