
उल्हासनगर : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणातील आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या विरोधात महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी उल्हासनगर पोलीस उपायुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत, ‘जर न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात हा मोर्चा नेऊ,’ असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.
मागील वर्षी २ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यावर गोळीबार केला होता. विशेष म्हणजे, त्याला पोलिसांनी अजूनही ‘फरार’ म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले नाही. ‘एक वर्ष उलटले तरी पोलिसांना आरोपी वैभव गायकवाड सापडत नाही? की तो सापडू नये यासाठी काही राजकीय हात आहेत?’ असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. भाजपकडून वैभव गायकवाडला अजूनही पदावर कायम ठेवले गेले आहे, त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली असली तरी त्यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी यावेळी केला आहे.
या मोर्चामुळे उल्हासनगरसह आजूबाजूच्या शहरातील राजकारणात तणाव वाढला आहे. भाजप-शिवसेना संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस आता काय पावले उचलणार? संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई झाली असली तरी, त्यांचा मुलगा वैभव गायकवाड अजूनही मोकळा फिरतोय. महेश गायकवाड यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरात नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पोलीस आणि सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेणार? महाराष्ट्र याकडे उत्सुकतेने पाहत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दालनात मोर्चा घेऊन जाणार!
‘सामान्य माणसाला तुरुंगात हालअपेष्टा भोगाव्या लागतात, पण मोठ्या राजकीय नेत्यांसाठी वेगळीच न्यायव्यवस्था आहे. हेच जर एका शिवसैनिकाने केले असते, तर त्याला त्वरित अटक करून थेट शिक्षा दिली असती,’ असे गायकवाड यांनी सांगितले. महेश गायकवाड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ‘जर लवकरच या प्रकरणातील फरार आरोपीला अटक झाली नाही, तर आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात मोर्चा घेऊन जाणार! अन्याय सहन केला जाणार नाही!’ असे स्पष्ट केले.