

उल्हासनगर : शहरातील आनंदनगर फर्स्ट गेट, उल्हासनगर-अंबरनाथ मार्ग परिसरात २०० पेक्षा अधिक आधारकार्ड रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला विखुरलेल्या ओळखपत्रांची पाहणी केली असता त्यावरील पत्ते आणि छायाचित्रे बहुतांश उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ भागातील रहिवाशांची असल्याचे आढळून आले आहे.
नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा दस्तावेज थेट रस्त्यावर कसा पोहोचला, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वितरण प्रक्रियेत कोणाकडून हलगर्जीपणा झाला का, याचा तपास मध्यवर्ती पोलीस करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत सर्व ओळखपत्रे जमा करून मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.