नव्या राजकीय पक्षात प्रवेश, निवडणूक मात्र मूळ पक्षाच्या चिन्हावरच; पक्षांतर केलेल्या ६ माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

एका बाजूला नव्या पक्षात प्रवेशाचे राजकीय ‘इन्व्हेस्टमेंट’, दुसऱ्या बाजूला ‘मूळ पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक’ ही सक्ती आणि मध्येच आगामी निवडणुकीचे समीकरण सर्वांनी या माजी नगरसेवकांची डोकेदुखी वाढवली आहे.

Published on

उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठे नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमधील सहा माजी नगरसेवकांनी मोठ्या थाटात शिवसेना (शिंदे गट) आणि टीम ओमी कलानीत 'राजकीय गृहप्रवेश' करून उल्हासनगरच्या राजकारणात भूकंप होईल, अशी चर्चा पेटवली होती. या प्रवेशामुळे शहरातील सत्तासमीकरण बदलणार, नेतृत्वात नवी शक्ती निर्माण होणार आणि निवडणुकीतील रणनीतीत उलटफेर होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या नव्या राजकीय गणिताला अचानकच ब्रेक लागला असून संपुर्ण चित्र भाजपा शिवसेना (शिंदे गट) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने आणि मंत्री दादा भुसे यांच्या एका विधानामुळे पालटले आहे.

मंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच स्पष्ट केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनुसार, आता एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जाणार नाहीत. तसेच जे माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे आले आहेत, त्यांना वेळ पडल्यास येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मूळ पक्षाच्या चिन्हावरूनच लढवावे लागेल.” या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि टीम ओमी कलानीत 'राजकीय गृहप्रवेश' केलेल्या सर्वच माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण, त्यांनी नुकताच पक्षांतर करून नव्या राजकीय शिडीवर पाऊल टाकले असतानाच ‘मूळ पक्षाच्या चिन्हावर’ निवडणूक लढवावी लागेल, या निर्णयामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत संभ्रम आणि गोंधळ वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु आहे, त्यामुळे पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांची अस्वस्थतता आणखीनच वाढली आहे.

एका बाजूला नव्या पक्षात प्रवेशाचे राजकीय ‘इन्व्हेस्टमेंट’, दुसऱ्या बाजूला ‘मूळ पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक’ ही सक्ती आणि मध्येच आगामी निवडणुकीचे समीकरण सर्वांनी या माजी नगरसेवकांची डोकेदुखी वाढवली आहे.

आव्हानात्मक स्थिती:

  • निवडणुकी वेळी कोणत्या पक्षाचे चिन्ह वापरायचे?

  • पोस्टरवर कोणाचा फोटो लावायचा - शिंदे, फडणवीस की ओमी कलानी?

  • मतदारांसमोर आपली राजकीय ओळख कशी सादर करायची?

  • सध्याचे राजकीय गुंतवणूक आणि पद लाभाचा काय परिणाम होणार?

या सर्व प्रश्नांनी सहा नगरसेवकांमध्ये प्रचंड संभ्रम, अस्वस्थता निर्माण झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in