उल्हासनगरात खड्ड्यांमध्ये बसून रिक्षाचालकांचे अनोखे आंदोलन; BMC चा निषेध करत घोषणाबाजी

उल्हासनगरच्या खड्डेमय रस्त्यांवरून संतप्त रिक्षाचालकांचा संताप उफाळून आला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी आंदोलनाचा एक अनोखा मार्ग निवडला आणि थेट खड्ड्यांत बसून निषेध व्यक्त केला.
उल्हासनगरात खड्ड्यांमध्ये बसून रिक्षाचालकांचे अनोखे आंदोलन; BMC चा निषेध करत घोषणाबाजी
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरच्या खड्डेमय रस्त्यांवरून संतप्त रिक्षाचालकांचा संताप उफाळून आला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी आंदोलनाचा एक अनोखा मार्ग निवडला आणि थेट खड्ड्यांत बसून निषेध व्यक्त केला. हा अनोखा विरोध शहरातील ढासळलेल्या रस्त्यांची भयावह स्थिती आणि प्रशासनाच्या उदासीनतेची साक्ष देतो.

उल्हासनगर शहरात रस्त्यांची अवस्था अक्षरशः ‘खड्डे की रस्ते?’ असा प्रश्न निर्माण करत आहे. धोबीघाट ते मच्छी मार्केट रस्ता, तसेच कल्याण-बदलापूर रोडवरील खड्डे वाहनचालकांचे प्राण घेण्याच्या तयारीत असल्यासारखे वाटत आहेत. सततच्या पावसामुळे हे खड्डे अधिक खोल बनले असून त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांपासून पादचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच संकटाचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी उल्हासनगरातील काही रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. धोबीघाट ते मच्छी मार्केट रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये बसून त्यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. “खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करतोय, कारण महापालिकेला गाडीत बसलेल्यांचा आवाज ऐकू येत नाही,” असे टोमणे देत त्यांनी निषेध फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी रिक्षाचालकांसह सामान्य नागरिक करत आहेत. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांचाही सोशल मीडियावरून पाठिंबा

नागरिकांचाही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. अनेकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर सोशल मीडियावरून महापालिकेवर ताशेरे ओढले. "रस्ते उकरून ठेवले, पण पुन्हा भरलेच नाहीत. हे विकासकाम आहे की विनाशकाम?" असा सवाल करत नागरिकांनी प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आणली.

दररोज रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आमच्या रिक्षांचे नुकसान होते आहे. प्रवाशांचे आयुष्य धोक्यात येतेय. कितीदा तक्रार केली तरी प्रशासन ढिम्मच आहे.

रिक्षाचालक

logo
marathi.freepressjournal.in