Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न काही दूर झालेले नाही.
Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल
Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवालसंग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उल्हासनगर : गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न काही दूर झालेले नाही. गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याचा महापौरांचा संकल्प प्रत्यक्षात मात्र खड्ड्यातच गेल्याचे चित्र शहरात दिसत आहे. त्यामुळे 'महापौर मॅडम, बाप्पानेही खड्ड्यांतूनच यायचे का?' असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कॅम्प क्रमांक ४ मधील पॅनल क्रमांक १६ तसेच ओटी सेक्शन-२ परिसरातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

नेताजी स्कूल ते हनुमान मंदिरमार्गे एसएसटी कॉलेज, उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील फिश मार्केट ते धोबीघाट तसेच आनंदपूर दरबार ते झुलेलाल मंदिर या मार्गावर खड्डे, चिखल आणि उखडलेला रस्ता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार झालेल्या खोदकामामुळे काही ठिकाणी काँक्रीट, काही ठिकाणी डांबर तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, अशी रस्त्यांची विस्कळीत अवस्था झाली आहे.

नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

याच परिसरातून महापौरांचा नियमित प्रवास होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्यांची ही दुरवस्था महापौरांच्या निदर्शनास येत नाही का? नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने नागरिक आणि गणेशभक्तांची या रस्त्यांवरून ये-जा होणार आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी तरी महापालिका प्रशासन जागे होऊन शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in