उल्हासनगर : शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करून अवघ्या दोनच दिवसांत पुन्हा तेच रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि एमएमआरडीए यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
उल्हासनगर शहरातील विकासकामांमध्ये प्रशासनातील विस्कळीत समन्वयामुळे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात न्यू इंग्लिश हायस्कूल ते नेताजी पुतळा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. काही दिवसांतच पुन्हा त्यावर खडी टाकून गुळगुळीत करण्यात आले. मात्र दोनच दिवसांत एमएमआरडीएच्या कामासाठी तोच रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मनसेने प्रशासनाला पूर्वीच लेखी कळवले होते की, ज्या रस्त्यांवर भुयारी गटारीचे काम होणार आहे, ते रस्ते आधी करू नयेत. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि नवीन रस्ते तयार करून नंतर त्यांनाच खोदण्याचा प्रकार सुरू राहिला. यामुळे करदात्यांचा पैसा वाया जात आहे.
बंडू देशमुख, जिल्हाध्यक्ष, मनसे
सध्या शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाकडे याबाबत कोणताही ठोस उपाय नसल्याने नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे जर अशाप्रकारे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करून निष्काळजी कामे केली गेली, तर पक्ष आपल्या पद्धतीने जोरदार आंदोलन उभे करेल असा इशारा बंडू देशमुख यांनी दिला आहे.