‘मला मराठी येत नाही, जे करायचे ते करा!’ उल्हासनगर स्टेशनवर RPF जवानाची मुजोरी

विशेष म्हणजे, या जवानाच्या एका वरिष्ठ मराठी अधिकाऱ्यानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत, 'त्याला मराठी येतं, पण तुम्हाला हिंदी येत नाही का?' असा उलट सवाल केला.
व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकावर मराठी भाषेचा अपमान करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाने मराठीत संवाद साधण्यास नकार देत, मला मराठी येत नाही, जे करायचे असेल ते करा, अशी उद्धट भाषा वापरली. याप्रकरणी मनसे नेते सचिन कदम यांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला असता, या जवानाने आक्रमक भाषा वापरत हिंदी लादण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, या जवानाच्या एका वरिष्ठ मराठी अधिकाऱ्यानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत, 'त्याला मराठी येतं, पण तुम्हाला हिंदी येत नाही का?' असा उलट सवाल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या सन्मानासाठी विशेष शासन निर्णय जारी केला असतानाही, रेल्वे प्रशासनातच त्याला हरताळ फासला जातोय का ? या प्रश्नाने संतप्त भावना निर्माण केल्या आहेत.

उल्हासनगर रेल्वे स्थानकावर बुकिंगशी संबंधित एका गोंधळाच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी मनसे नेते सचिन कदम गेले असता, त्यांची चर्चा तिथल्या आरपीएफ जवानासोबत झाली. नेहमी प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी हिंदीत संवाद साधायला सुरुवात केली. कदम यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता, आरपीएफ जवानाने थेट 'मला मराठी येत नाही,' असा जवाब दिला. तेव्हा कदम यांनी त्याच्यावर वरिष्ठांकडे तक्रार करतो असे सांगितले असता, त्या जवानाने आणखी निर्लज्जपणे, 'माझी तक्रार करा, मला हिंदीच येतं,' असे आव्हान दिले.

तुम्हाला हिंदी येत नाही का ?

हा वाद आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. मात्र, आश्चर्य म्हणजे, या अधिकाऱ्याने संबंधित जवानाला मराठीत संवाद साधण्यास सांगण्याऐवजी, उलट सचिन कदम यांनाच विचारले की, 'तुम्हाला हिंदी येत नाही का?' यावर सचिन कदम यांनी शासनाच्या निर्णयाबाबत सांगितले आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उल्लेख केला. मात्र, या अधिकाऱ्याला त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले.

मनसे आक्रमक भूमिका घेईल

महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला नकार देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरपीएफ प्रशासनात मराठीचा अवमान चालणार नाही. मनसेच्या अधिकृत प्रतिनिधींनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने मराठीत संवाद साधण्यास सक्षम असले पाहिजे. तसे न केल्यास, मनसे अशा अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेईल. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in