उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये क्षणात एका कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. कॅम्प क्रमांक ३ मधील बॅरेक क्रमांक ८९६ येथे सफाई कर्मचारी महादू जगताप यांची नशेत असलेल्या इसमाने चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने काही तासांतच त्यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुहेरी शोकांतिकेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात खळबळ उडाली आहे.
महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प १ मधील शहाड गावठाण परिसरात वास्तव्यास होते. ते कोणार्क इन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत असून पॅनल क्रमांक ११ मध्ये त्यांची ड्युटी होती. सकाळी ड्युटीवर असतानाच कॅम्प क्रमांक ३ येथील माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर एका नशेत असलेल्या इसमाने त्यांच्यावर अचानक चाकू हल्ला केला. या हल्ल्यात नशेखोराने महादू यांच्यावर तब्बल ३२ वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत हल्लेखोर दुर्गेश गुप्ता याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे तसेच पोलीस कर्मचारी प्रशांत धुळे आणि किशोर काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जगताप दांपत्याला सात वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या वतीने मंगळवारी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.