नव्या शहाड उड्डाणपुलासाठी हालचालींना वेग; महापौरांनी घेतला प्रकल्पाचा आढावा

शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला गती देण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी पुढाकार घेतला आहे. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत प्रकल्पातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे तातडीने दूर करून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला लवकर सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नव्या शहाड उड्डाणपुलासाठी हालचालींना वेग; महापौरांनी घेतला प्रकल्पाचा आढावा
नव्या शहाड उड्डाणपुलासाठी हालचालींना वेग; महापौरांनी घेतला प्रकल्पाचा आढावा
Published on: 

उल्हासनगर : शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला गती देण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी पुढाकार घेतला आहे. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत प्रकल्पातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे तातडीने दूर करून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला लवकर सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यात प्रकल्पाच्या सद्यस्थितीसह बांधकामात येणाऱ्या विविध अडचणी, प्रलंबित बाबी आणि संबंधित विभागांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः रेल्वे आणि विद्युत विभागाने परस्पर समन्वय साधून प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, शहर अभियंता निलेश शिरसाठे, कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्यासह एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, पाणीपुरवठा आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहाड उड्डाणपूल हा उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पुनर्बांधणीचे काम विनाविलंब सुरू करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, या बैठकीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला कधी सुरुवात होणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)