Ulhasnagar : शांतीसदन महिला वसतिगृहातून महिलांचे पलायन; चार महिला सापडल्या; सहा अजूनही बेपत्ता
उल्हासनगर : उल्हासनगरातील शांतीसदन महिला वसतिगृहातून तब्बल दहा महिलांच्या पलायनाने खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून चार महिलांना ताब्यात घेतले असले तरी सहा महिला अद्यापही बेपत्ता आहेत. दसऱ्याच्या आदल्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॅम्प क्रमांक ५ मधील शांतीसदन महिला वसतिगृहात पिटा कायद्यांतर्गत (अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायदा) अटक केलेल्या महिलांना ठेवण्यात आले होते.
मात्र दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी उशिरा रात्री महिला सुरक्षारक्षकांचे लक्ष चुकवून या दहा महिला वसतिगृहातून पलायन करण्यात यशस्वी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेऊन आतापर्यंत चार महिलांना शोधून ताब्यात घेतले आहे.
परंतु उर्वरित सहा महिलांचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने तपासाची दिशा गंभीर झाली आहे. पोलिसांच्या पथकाकडून परिसरातील संवेदनशील भागात कसून तपासणी सुरू आहे.