शिंदेसेनेची उल्हासनगरात ‘मॅजिक फिगर’ पूर्ण; गटनेतेपदी अरुण आशान; ४० नगरसेवकांचे संख्याबळ

उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सुरू असलेल्या जोरदार राजकीय चढाओढीवर अखेर शिंदेसेनेने निर्णायक बाजी मारली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४० चा ‘मॅजिक फिगर’ गाठत शिंदेसेनेने महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत.
शिंदेसेनेची उल्हासनगरात ‘मॅजिक फिगर’ पूर्ण; गटनेतेपदी अरुण आशान; ४० नगरसेवकांचे संख्याबळ
Photo : X (DrSEShinde)
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सुरू असलेल्या जोरदार राजकीय चढाओढीवर अखेर शिंदेसेनेने निर्णायक बाजी मारली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४० चा ‘मॅजिक फिगर’ गाठत शिंदेसेनेने महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत.

कोकण भवन येथे झालेल्या अधिकृत गटनिहाय नोंदणीत शिंदेसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवून स्पष्ट बहुमत सिद्ध केले. तसेच गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती करण्यात आली. या घडामोडींमुळे महापौरपदावर शिंदेसेनेचा दावा अधिकच मजबूत झाला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पक्षीय बलाबल पाहता भाजप -३७, शिंदेसेना -३६, वंचित बहुजन आघाडी-२, साई पक्ष - १, काँग्रेस- १, अपक्ष - १ अशी स्थिती आहे. ४० चा आकडा गाठण्यासाठी भाजप थोडक्यात मागे पडला, तर शिंदेसेनेने अचूक राजकीय गणित आणि छोट्या पक्षांशी संवाद साधून आवश्यक संख्याबळ मिळवले. शिंदेसेनेच्या ३६ नगरसेवकांसह वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि १ अपक्ष अशा एकूण ४० नगरसेवकांचा गट तयार झाला. गुरुवारी कोकण भवन येथे हा गट अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) म्हणून नोंदणीकृत झाला.गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या म्हणजे महापालिकेत पक्षाची धोरणे प्रभावीपणे राबवणे,४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करणे, प्रशासनावर मजबूत पकड ठेवणे या जबाबदाऱ्यांमुळे महापालिकेतील निर्णयप्रक्रिया आणि धोरणे शिंदेसेनेच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.

महापौरपदाचा मार्ग मोकळा

भाजप ३७ जागांवर अडकल्याने आणि शिंदेसेनेने ४० चा बहुमताचा आकडा पार केल्याने, उल्हासनगर महापौरपदावर शिंदेसेनेचा दावा निर्णायक ठरला आहे. शहरात आता शिंदेसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होण्याचे ठोस संकेत दिसून येत आहेत, तर भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in