

उल्हासनगर : शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदावरून निर्माण झालेल्या वादाला रक्तरंजित वळण लागले असून, मराठा सेक्शन परिसरातील शाखाप्रमुख विशाल बाविस्कर (४४) यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत बाविस्कर यांच्या पाठीवर आणि दोन्ही मनगटांवर चाकूने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचा पुतण्या चिराग यादव याच्यावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाखाप्रमुखपद मिळविण्यासाठी विशाल बाविस्कर यांनी नगरसेवक यादव यांची मदत घेतल्याच्या कारणावरून चिरागने त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत बाविस्कर यांनी नगरसेवक यादव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर यादव यांनी चिरागला समज देत कानशिलात लगावली होती. याच रागातून जिजामाता गार्डनजवळील आशीर्वाद रुग्णालयासमोर चिरागने बाविस्कर यांच्यावर पाठीमागून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.