उल्हासनगर शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळावा हाऊसफुल्ल

आम्ही खंबीरपणे उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार असा निर्धार कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात व्यक्त केला
उल्हासनगर शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळावा हाऊसफुल्ल

शिवसेनेचा कार्यकर्ता निर्धार मेळावा हा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आनंद दिघे यांची शिवसेना एकवटल्याने हाऊसफुल्ल ठरला आहे. आम्ही खंबीरपणे उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहणार असा निर्धार कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात व्यक्त केला. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेतील पदाधिकारी आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी, महिलांनी हात उंचावून हा निर्धार पक्का केला.

उल्हासनगर कॅम्प 4 मधील कुर्ला कॅम्प परिसरातील स्वामी शांतीप्रकाश हॉलमध्ये काल रात्री शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे व पालघर जिल्हा महिला संघटक अनिता बिर्जे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, प्रथम माजी शहरप्रमुख रमेश मुकणे, जेष्ठ माजी नगरसेवक धनंजय बोडारे, रमेश चव्हाण, दिलीप मालवणकर, रिक्षा युनियन अध्यक्ष रवींद्रसिंग भुल्लर, कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव, रमाकांत देवळेकर, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार आदी पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुने नवे निष्ठावंत शिवसैनिक आणि 60 टक्के नगरसेवक हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत, ही मोठी जमेची बाजू असल्याचे सुभाष भोईर म्हणाले. अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. तसेच उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी सुभाष भोईर यांना विचारणा केली असता आम्ही एकत्रितपणे राहत असताना असा कोणताच प्रकार होत नव्हता. आता मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, याचा समाचार घेताना असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी ते समर्थपणे पेलण्याची ताकद शिवसेनेमध्ये असल्याचे भोईर म्हणाले.

उल्हासनगर शहरात शिवसेनेला खिंडार पडल्याची चर्चा होती, परंतु आज शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात हजारोच्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडी शिवसेने सोबत असल्याचे स्पष्ट केले. नेते गेले परंतु निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेसोबत असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in