आईच्या संघर्षाला यशाचे पंख! उल्हासनगरच्या विशुध्दी-सम्यकची आकाशभरारी; विमानशास्त्रात घडवली नवी ओळख

वडिलांच्या निधनानंतर कोसळलेल्या संकटांशी दोन हात करत आईने मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली झुंज आणि त्या संघर्षाला यशाचे पंख लावत विमानशास्त्रासारख्या अत्यंत तांत्रिक क्षेत्रात करीअर घडवणाऱ्या उल्हासनगरातील दोन भावंडांची प्रेरणादायी कहाणी सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
आईच्या संघर्षाला यशाचे पंख! उल्हासनगरच्या विशुध्दी-सम्यकची आकाशभरारी; विमानशास्त्रात घडवली नवी ओळख
आईच्या संघर्षाला यशाचे पंख! उल्हासनगरच्या विशुध्दी-सम्यकची आकाशभरारी; विमानशास्त्रात घडवली नवी ओळख
Published on

उल्हासनगर : वडिलांच्या निधनानंतर कोसळलेल्या संकटांशी दोन हात करत आईने मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली झुंज आणि त्या संघर्षाला यशाचे पंख लावत विमानशास्त्रासारख्या अत्यंत तांत्रिक क्षेत्रात करीअर घडवणाऱ्या उल्हासनगरातील दोन भावंडांची प्रेरणादायी कहाणी सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे. जिद्द, मेहनत आणि आईच्या कष्टांच्या बळावर विशुध्दी आणि सम्यक सोनवणे यांनी अक्षरशः ‘आकाशाला गवसणी’ घालत एव्हिएशन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

उल्हासनगरातील सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कानसाई रोड परिसरात राहणारे विशुध्दी विकास सोनवणे आणि सम्यक विकास सोनवणे या भावंडांनी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या एव्हिएशन इंजिनिअरिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विमानांची देखभाल, इंजिन, सुरक्षा प्रणाली आणि तांत्रिक बारकावे यांचा सखोल अभ्यास आवश्यक असलेल्या या क्षेत्रात दोघांनीही मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

वडिलांचा मृत्यू, आईची खंबीर साथ

कोरोना काळात वडील विकास सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्या वेळी विशुध्दी बारावीत तर सम्यक दहावीत शिक्षण घेत होता. मात्र आई सुनीता सोनवणे यांनी खंबीरपणे परिस्थितीचा सामना करत मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आर्थिक अडचणी, जबाबदाऱ्या आणि एकाकीपणाच्या संकटातून मार्ग काढताना त्यांनी सलाम बालक संस्थेच्या मदतीने स्वतःला सक्षम बनवले आणि मुलांच्या स्वप्नांना बळ दिले.

संघर्षातून सुयश

विशुध्दीने नवी मुंबईतील इंडियन एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधून एव्हिएशन इंजिनीअरिंग पूर्ण करून बेंगळुरू येथील नामांकित एअरवर्क्स कंपनीत ज्युनिअर टेक्निशियन म्हणून नोकरी मिळवली आहे तर सम्यकने ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीमधून शिक्षण पूर्ण करून हैदराबाद येथील टाटा अँडवान्स सिस्टिम लिमिटेडमध्ये रुजू होत यशाची दुसरी पायरी गाठली आहे. संघर्षातून यश मिळवलेल्या या भावंडांची कहाणी आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in