
उल्हासनगर : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून अटक केलेले दोन दहशतवादी काही दिवसांपूर्वी उल्हासनगरातील नेवाळी परिसरात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. या धडक कारवाईनंतर दिल्ली पोलीस आणि उल्हासनगर पोलिसांनी तातडीने नेवाळी परिसर गाठत येथे झडती घेतली असून शहरात खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसिसशी संबंधित पाच दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यापैकी दोन दहशतवादी निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून पकडले गेले. तपासात समोर आले की, हे दोघे काही दिवसांपूर्वीपर्यंत उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी भागात राहत होते. अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी उल्हासनगर शहर गाठत नेवाळी परिसरातील त्यांच्या भाड्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यांच्या हालचाली व संपर्क जाळ्याचा तपास स्थानिक पोलीस आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त टीम करत आहे.
या उघडकीमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक परिसरात दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर पोलिसांनी तातडीने परिसरात गस्त वाढवली असून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून, दिल्लीतील कारवाईनंतर राज्य व केंद्र सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नेवाळी परिसर दहशतवाद्यांचे निवासस्थान ठरल्याने पुढील काही दिवसांत तपास आणखी गती घेण्याची शक्यता आहे.