उल्हासनगरात पाच मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळले

उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक तीनमधील पंजाबी कॉलनी परिसरातील शिवगंगा पार्क या पाच मजली इमारतीचे दोन स्लॅब एकामागोमाग कोसळल्याची घटना घडली.
उल्हासनगरात पाच मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळले
Published on: 

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक तीनमधील पंजाबी कॉलनी परिसरातील शिवगंगा पार्क या पाच मजली इमारतीचे दोन स्लॅब एकामागोमाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५०६ चा स्लॅब चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०६ वर कोसळला. त्यानंतर चौथ्या मजल्यावरील स्लॅबही तुटून तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०६ वर पडला. या घटनेमुळे रहिवाशांची एकच धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेमुळे उल्हासनगरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून वेळीच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in