

उल्हासनगर : अनधिकृत घरांचा वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, जमिनींच्या मालकी हक्काची प्रतीक्षा आणि विस्कळीत नगररचनेच्या समस्यांनी ग्रासलेल्या उल्हासनगरच्या विकासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अनधिकृत घरे अधिकृत करण्यासह जमिनी फ्री होल्ड करण्याचा आणि समूह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध पुनर्विकास करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यामुळे उल्हासनगरकरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) संस्थेच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. एकेकाळी नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरची नगररचना कालांतराने विस्कळीत झाली. अनधिकृत बांधकामे आणि जमिनींच्या मालकी हक्कांचे प्रश्न यामुळे शहराच्या विकासात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.
या समस्यांवर उपाय म्हणून अनधिकृत घरांना अधिकृतता देण्यासह समूह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचा व्यापक पुनर्विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एचएसएनसी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना शिक्षण हे केवळ व्यवसायाचे साधन नसून समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंधी समाजाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले
सिंधी समाजाच्या जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न सोडविण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. सिंधी बांधवांना जमिनींच्या मालकी हक्काचे पट्टे देऊन त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूरमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, लवकरच उल्हासनगरमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी समाजाने प्रतिकूल परिस्थितीत कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उद्योग, व्यापार, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महापौरांची अनुपस्थिती
उल्हासनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्हासनगर दौऱ्यात सीएचएम महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा राजकीय चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाला महापौर अश्विनी निकम यांना निमंत्रण नसल्याची चर्चा रंगली असून, भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती यामुळे महायुतीतील अंतर्गत दुराव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, कार्यक्रमातील व्यवस्थेवरूनही नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांना तासन् तास कडक उन्हात बसावे लागल्याचे चित्र दिसून आले. उन्हापासून बचाव करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर रुमाल घेतले होते. शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने महाविद्यालय प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौर अश्विनी निकम आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजू लालवाणी-पाठक यांच्याशी या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.