उल्हासनगर : उल्हासनगरच्या शेजारील वरप गावातील देवी मंदिराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक सुटकेस आढळून आली असून त्यामध्ये एक व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निशाण आढळून आल्याने हत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरूवारी सकाळी परिसरातील एक व्यक्ती शौचास जात असताना त्याला कचऱ्यात एक मोठी बंद सुटकेस निदर्शनास आली. कुतूहलाने त्याने सूटकेस उघडली असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सुटकेसमध्ये एक व्यक्तीचा मृतदेह आढळला, ज्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निशाण होते. त्याने तत्काळ टिटवाळा पोलिसांना याबाबत माहिती दिली.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.