

उल्हासनगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तर्फे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र तसेच बारवी गुरुत्ववाहिनीवर महत्त्वाचे दुरुस्ती व देखभाल काम हाती घेण्यात आल्यामुळे उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा तब्बल २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. गुरुवार, २९ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, ३० जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा पुरवठा बंद राहील.
या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प राहणार असून कॅम्प क्रमांक ४, कॅम्प क्रमांक ५ तसेच कॅम्प क्रमांक ३ मधील काही भागांत नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. एमआयडीसीकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनीवरील देखभाल व तांत्रिक दुरुस्तीची कामे अत्यावश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे व जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शनिवारीही कमी दाबाने पुरवठा?
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवार, ३१ जानेवारी रोजी कमी दाबाने व मर्यादित प्रमाणात पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन उल्हासनगर महापालिकेचे कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) अशोक घुले यांनी केले आहे.