आचारसंहितेच्या नावाखाली अनधिकृत पार्किंगला अभय

उल्हासनगर मनपाच्या अखत्यारितील शहाड रेल्वे स्थानकजवळ आणि उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या जवळील पश्चिम भागात अनेक वर्षांपासून मनपाच्या भूखंडांवर बेकायदेशीररीत्या पार्किंग स्टॅण्ड उभारून काही कथित दादा वसुली करीत आहेत.
आचारसंहितेच्या नावाखाली अनधिकृत पार्किंगला अभय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात मनपाच्या भूखंडांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग स्टॅण्ड उभारून कथित दादा वसुली करीत आहेत. मनपा प्रशासनाने असे भूखंड ताब्यात घेऊन पार्किंगसाठी निविदा काढल्या आहेत, मात्र त्यानंतर ज्या कंपनीला रितसर पार्किंग स्टॅण्ड चालविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे त्यांच्या ताब्यात पार्किंग स्टॅण्ड देण्यास अनधिकृत पार्किंग स्टॅण्डवाले नकार देत असून आचारसंहिता लागू झाल्याने तुम्ही जमिनीचा ताबा घेऊ शकत नाही, अशी दादागिरी सध्या उल्हासनगरमध्ये सुरू आहे.

उल्हासनगर मनपाच्या अखत्यारितील शहाड रेल्वे स्थानकजवळ आणि उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या जवळील पश्चिम भागात अनेक वर्षांपासून मनपाच्या भूखंडांवर बेकायदेशीररीत्या पार्किंग स्टॅण्ड उभारून काही कथित दादा वसुली करीत आहेत. या दादांना काही राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे, या संदर्भात मनपा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक वेळा मनपा प्रशासनाने हे बेकायदेशीर स्टॅण्ड बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मनपा प्रशासनाने शहाड रेल्वे स्थानकजवळ आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकजवळील पार्किंग स्टॅण्डबाबत निविदा प्रसिद्ध केल्यानंतर या दोन्ही ठिकाणच्या पार्किंग स्टॅण्डची वसुली करण्याचा ३ वर्षांसाठीचा ठेका हा सृष्टी इंटरप्राईजेसला ई-निविदा अन्वये देण्यात आला आहे. या अंतर्गत १५ मार्चपासून ठेकदारास मनपच्या मालमत्ता विभागाने पार्किंग स्टॅण्ड ताब्यात द्यायचे होते मात्र ही कार्यवाही झालेली नसल्याचे स्पष्टीकरण सृष्टी इंटरप्रायझेस कंपनीकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, सृष्टी इंटरप्रायझेस कंपनीकडून आयुक्तांना एका पत्राद्वारे हे वाहनतळ ताब्यात घेऊन आम्हास हस्तांतरित करण्याची विनंती केली. परंतु मनपाने याकरिता आचारसंहितेची आडकाठी करत पळवाट काढली आहे. या संदर्भात मनपा प्रशासनावर बेकायदेशीर स्टॅण्ड चालविणाऱ्या इसमांनी दबाव आल्यानंतरचा मनपा प्रशासनाने ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी मनपा निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे मागवून पार्किंग स्टॅण्डबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही १६ मार्चच्या दुपारपासून लागू झाली असून याबाबत कोणतेही आर्थिक तरतुदीचे, नवीन धोरण, कार्यादेश अंमलात आणू नये असे निर्बंध आहेत. त्याचा या कंत्राटाबाबत काहीही संबंध नसून मनपा प्रशासन याचा विपर्यास करून आपली जबाबदारी झटकत आहे.

- एल. बी. पाटील, मालक सृष्टी इंटरप्रायझेस कंपनी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in