अनधिकृत नळजोडणीचा प्रश्न ऐरणीवर

अनधिकृत नळजोडण्या हजाराच्या संख्येने असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या जोडण्या शोधणे हे मोठे आव्हान असणार आहे.
अनधिकृत नळजोडणीचा प्रश्न ऐरणीवर

जव्हार : शहरात अनधिकृत नळजोडण्या मोठ्या प्रमाणात असून फुकटात मिळणाऱ्या पाण्याची नासाडी केली जाते, परंतु या नळजोडणी नेमक्या शोधाव्या कशा? जरी सापडल्या तरी नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग अशा महाभागांवर दंडात्मक कारवाई करेल का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अनधिकृत नळजोडण्या शोधणार कशा? हा प्रश्न कायम आहे. यासाठी मुख्य जलवाहिनी कोठे आहे, ते शोधून तिला जोडणी द्यावी लागते. त्या त्या भागात कार्यरत, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यासच हे ठाऊक असते. सामान्य नागरिक अगदी राजरोसपणे खड्डा खोदून अनधिकृत नळजोडणी घेऊ शकत नाही. संबंधित यंत्रणेतील माहितीगाराच्या सहकार्याशिवाय अशी जोडणी घेता येणे कठीण असते असे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.

हे फुकट पाणी वापरणारे नागरिकांना जल हे तो कल हे या गोष्टीचा विसर पडला आहे. पाण्याची टाकी भरून पाणी ओसंडून वाहणे, अंगण धुणे, रस्त्यावर पाणी मारणे, वाहणे धुणे असा पाण्याचा अपव्यय राजरोसपणे करीत आहेत, या बाबीची नगरपरिषद प्रशासनाने गंभीरपणे दखल घेवून उपाययोजना करण्याची शहरातील महिलांनी मागणी केली आहे.

अनधिकृत नळजोडण्या हजाराच्या संख्येने असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या जोडण्या शोधणे हे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी नगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही आहे. या जोडण्या देण्यात गुंतलेल्यांवर काय कारवाई होणार याचीही स्पष्टता नाही. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही, शिवाय नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवातीआधीच नळ जोडणी देवून पूर्ण बांधकाम हे घरगुती वापराच्या कर आकारणीतून केले जाते, हे कुठेतरी थांबायला हवे.

- राजेश धात्रक, सामाजिक कार्यकर्ते

शहरातील अनधिकृत नळजोडणी शोधण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. शिवाय फिरते वाहनातून दवंडीद्वारे सूचना नागरिकांना दिल्या जातील.

- मानिनी कांबळे, मुख्याधिकारी, जव्हार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in