बदलापूरच्या उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

हर घर तिरंगा अभियानातंर्गत नागरिक घरांवर, दुकानांवर, इमारतींवर तिरंगा ध्वज उभारून आनंद व्यक्त करीत आहेत
बदलापूरच्या उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
Published on

कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासन एकीकडे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, दुसरीकडे स्वातंत्र्य दिन आता अवघ्या काही तासांवर असताना नगर परिषद कार्यालयासमोरच्या उड्डाणपूलावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हर घर तिरंगा अभियानातंर्गत नागरिक घरांवर, दुकानांवर, इमारतींवर तिरंगा ध्वज उभारून आनंद व्यक्त करीत आहेत. कुळगाव-बदलापूर नगर परिषद कार्यालयातही रंगरंगोटी करून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या व नगर परिषदेच्या दुबे रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या संदेशानी सुशोभित झाल्या आहेत. असे असताना नगर परिषद कार्यालयासमोरील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे मात्र नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

कुळगाव-बदलापूर नगर परिषद कार्यालयासमोरून जाणाऱ्या बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्वेकडील स्टेशन ते कात्रप रस्त्यावरून उड्डाणपूलावर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in