अज्ञाताने फळ विक्रेत्यास भोसकले

धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अज्ञाताने फळ विक्रेत्यास भोसकले

भिवंडी : दोन अज्ञातांपैकी एकाने सोनाळे येथील फळ विक्रेत्यास शिवीगाळ केल्याने त्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका अज्ञाताने फळ विक्रेत्याला चापटीसह धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकुमार रामनारायण मोर्या (५०) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फळ विक्रेता सोनाळ्याहून भिवंडीच्या दिशेने जात होता. दरम्यान तो शांतीनगर परिसरातील पाइपलाईनजवळील बिलाल मस्जिदीसमोर आला असता, त्यास दोन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोघांपैकी एकाने फळ विक्रेत्यास प्रथम चापटीने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने पोटावर, कमरेवर व पाठीमागील बाजूस भोसकून त्यास गंभीर जखमी केले आहे. त्यावेळी झटापटीत फळ विक्रेत्याचा मोबाईल व घराची चावीही गहाळ झाली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in