मराठी शाळेत अपात्र गुजराती शिक्षक? ३२ विद्यार्थी नापास होऊनही टंकलेखिकेकडेच जबाबदारी; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किसननगर येथील ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा क्रमांक १ मध्ये शैक्षणिक पात्रता नसलेल्या गुजराती माध्यमाच्या शिक्षकांकडून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याचा आरोप होत आहे.
मराठी शाळेत अपात्र गुजराती शिक्षक? ३२ विद्यार्थी नापास होऊनही टंकलेखिकेकडेच जबाबदारी; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मराठी शाळेत अपात्र गुजराती शिक्षक? ३२ विद्यार्थी नापास होऊनही टंकलेखिकेकडेच जबाबदारी; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किसननगर येथील ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा क्रमांक १ मध्ये शैक्षणिक पात्रता नसलेल्या गुजराती माध्यमाच्या शिक्षकांकडून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाकडे लक्ष वेधूनही संबंधित शिक्षकांना हटविण्याऐवजी त्यांच्याकडेच अध्यापनाची जबाबदारी कायम ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे सामूहिक कॉपी प्रकरणात चर्चेत आलेल्या एका टंकलेखिकेकडूनही अध्यापनाचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप आहे. तिच्या वर्गातील तब्बल ३२ विद्यार्थी नापास झाले असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे सेनेचे नगरसेवक अनिल भोर यांनी हा मुद्दा मागील सर्वसाधारण सभेत उपस्थित करत शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मराठी माध्यमाच्या माध्यमिक वर्गांमध्ये गुजराती माध्यमातून डी.एड. केलेल्या शिक्षकांकडून अध्यापन करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर संबंधित शिक्षकांच्या जागी पात्र मराठी शिक्षकांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नसल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी जिल्हा शिक्षण विभागाला पत्र पाठवून संबंधित शिक्षकांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित शिक्षक चांगले अध्यापन करतात, असा दावा करत मुख्याध्यापकांनीच त्यांच्या बाजूने शिफारस केल्याचा आरोप नगरसेवक भोर यांनी केला आहे. शाळेतील आणखी एका प्रकरणात सामूहिक कॉपी प्रकरणात चर्चेत आलेल्या टंकलेखिकेकडून अध्यापनाचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप आहे. तिच्या वर्गातील ३२ विद्यार्थी नापास झाले.

पात्रतेकडे दुर्लक्ष

शिक्षक होण्यासाठी डी.एड. आणि बी.एड. या पात्रतांमध्ये मूलभूत फरक आहे. डी.एड. ही पात्रता प्रामुख्याने प्राथमिक स्तरावरील अध्यापनासाठी मान्य असून, माध्यमिक स्तरावर अध्यापनासाठी बी.एड. ही अनिवार्य शैक्षणिक पात्रता मानली जाते. असे असताना गुजराती माध्यमातून डी.एड. केलेल्या शिक्षकांना मराठी माध्यमाच्या माध्यमिक वर्गात शिकविण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सहा वर्गांसाठी एकच शिक्षक

याबाबत मुख्याध्यापक के. पी. जाधव यांनी शिक्षकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले आहे. शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध नसून सहा वर्गांसाठी एकच शिक्षक असल्याने पर्याय नसल्यामुळे गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शिक्षकांची कमतरता हे कारण देऊन विद्यार्थ्यांना अपात्र शिक्षकांच्या हवाली करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये २२२ शिक्षकांची पदे रिक्त

महापालिकेच्या आकडेवारीनुसार मंजूर ७३६ शिक्षक पदांपैकी केवळ ५१४ शिक्षक कार्यरत आहेत, तर २२२ पदे रिक्त आहेत. निवृत्तीमुळे ही संख्या आणखी वाढून २५७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मराठी माध्यमात १४५, उर्दू माध्यमात ४३, हिंदी माध्यमात २४ आणि इंग्रजी माध्यमात ११ शिक्षकांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदभरतीचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in