भाईंंदर : बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशभरात ९१-९२ सालच्या दंगलीत देखील विविध धर्मीय व जातींची वस्ती असलेले मीरा-भाईंदर हे शांत होते. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर सर्वांसाठी खुले होत असताना दुसरीकडे मीरारोडच्या नया नगरमधील दोन गटातील वादानंतर शहरात अनेक भागात सुरू झालेल्या तोडफोड, मारहाणीच्या घटनांच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर शहर बदनाम होऊन एकूणच शहरातील सामाजिक सलोख्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वीची गावे असताना पासून मूळचे हिंदू धर्मातील आगरी, आदिवासी आदींसह स्थानिक ख्रिस्ती, मुस्लीम एकत्र रहात आले आहेत. गुजराती-मारवाडी,जैन अनेक पिढ्यांपासून राहणारे आहेत. पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी देखील शहरातील सामाजिक सलोखा सांभाळण्याचे काम केले.
मुंबईला लागून असल्याने शहरात बांधकाम व्यवसाय तेजीत येऊन देशभरातून विविध जाती-धर्माचे लोक राहू लागले. परंतु गेल्या काही वर्षांत काही नव्याने उदयास आलेल्या राजकीय लोकांनी मतांसाठी जाती-धर्मात तेढ होईल, असे राजकारण सुरू केले. विशिष्ट समाजाच्या मतांसाठी मांस- मटणाची दुकाने बंद करण्याचे नियमबाह्य प्रस्ताव पालिकेत आणून तेढ निर्माण करण्यात आली. काही धार्मिक कार्यक्रम आड तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली गेली.
गेल्या रमझान महिन्यात देखील नया नगरमध्ये अन्य भागातील लोकांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात जाणीवपूर्वक घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत आरोपींना अटक केली. स्थानिक नागरिकांना सुद्धा कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना कळवा. असे आवाहन करतानाच पोलिसांनी नाकाबंदी, गस्त व बंदोबस्त चोख ठेवला होता. शहरातील विविध भागात एकट्या दुकट्या विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला हेरून त्याच्यावर धार्मिक दबाव आणत मारहाण, तोडफोड करण्याचे प्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. काही राजकीय नेते व कार्यकर्ते हे दंगा कसा पसरेल अशी वक्तव्ये करत आहेत.
मतांसाठी धार्मिक, जातीय समीकरणे
मीरारोडचा नया नगर हा मुस्लिम बहुल भाग असला तरी तेथे हिंदू व्यावसायिक व्यवसाय करतात. हिंदू मंदिर आहे व रहिवासी सुद्धा आहेत. ९१च्या दंगलीत देखील या भागातून कधी दगड भिरकावला गेला नाही. परंतु शहरातील अन्य भागाप्रमाणे येथे देखील कालांतराने विविध प्रांतातून लोकं येऊ लागले व नव्याने उदयास आलेल्या काही नेत्यांकडून मतांसाठी धार्मिक व जातीय समीकरणे आक्रमकपणे खेळली जाऊ लागली.