ठाणे/कल्याण/बदलापूर : ठाणे जिल्ह्याला सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. ठाणे, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. ऐन दुपारी काळोख पडून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दोन तास झालेल्या अवकाळी पावसामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे वाहनांवरच कोसळल्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे प्रशासनाच्या नालेसफाईचीही पोलखोल झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी दुपारनंतर आभाळ भरून आले होते. त्यापाठोपाठ वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी दोननंतर आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे पाऊस बरसणार असल्याची चाहूल लागली होती. वातावरण पाहून अनेकांनी घराची वाट धरली. अचानक आलेल्या पावसापासून बचाव कोणाकडेच छत्री नसल्याने अनेकांना भिजतच प्रवास करावा लागला. दुपारी ताशी १०० किमी वेगाने वादळी वारा वाहत होता. त्यामुळे धूळ आणि कचरा लोकांच्या घरात गेला.
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे मुख्य बाजरपेठेतील घरातील खिडक्यांची ग्रील व पत्रे उडून खाली पडले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंडाई शोरूम समोर दुभाजकातील झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. आनंद नगर चेक नाका रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ठाणे पूर्व एमएसईबी ऑफिसजवळ झाड पुडून वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कळवा मनीषा नगर परिसरात २ तर हरिनिवास सर्कल या ठिकाणी ३ मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.
पावसाआधीच बत्ती गुल
बदलापुरात दुपारी ३ वाजता अवकाळी पावसाला सुरुवात होण्याआधी वारे वेगाने वाहत होते. त्याचवेळी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता.
रेल्वे सेवा विस्कळीत
दुपारी पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात ओव्हर हेड वायरवर झाडाची मोठी फांदी कोसळल्याने व सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. सुमारे अर्ध्या तासात रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.मात्र तोपर्यंत प्रवाशांना रेल्वे स्थानकात खोळंबून रहावे लागले.
कल्याणात वादळी वाऱ्यासह पाऊस
कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. उन्हाच्या तीव्र झळा, अंगाची होणारी काहिलीमुळे कल्याण- डोंबिवलीमधील नागरिक हैराण झालेले होते. सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर शहरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिक काहीसे सुखावले. पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून काही भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. कल्याण,डोंबिवली सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
नवी मुंबईत नागरिकांची त्रेधातिरपीट
भयंकर उकाडा आणि उष्ण तापमानामुळे त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने थोडा फार दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी नवी मुंबईत प्रथम धुळीचे वादळ झाले. यानंतर जवळपास अर्ध्या तासाने पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. ताशी जवळपास ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे, त्यानंतर धुळीचे वादळ आले. यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या, वीजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या. ऐरोली येथे उच्च वीज दाबाच्या वीज वाहक वाहिन्यांमध्ये (हायटेन्शन वायर्स) स्फोट झाल्याची घटनाही घडली आहे.
शहापुरात मुसळधार अवकाळी पाऊस
शहापूरमध्ये सोमवारी दुपारी मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजाचा कडकडाट आणि जोरदार वादळी, मुसळधार पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. अवकाळी पावसामुळे गुरांसाठी ठेवण्यात आलेली वैरण (चारा ) पार भिजून गेली असल्याने गुरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही भागात विटभट्टी वाल्यांचेही नुकसान झाले. आज सकाळपासून प्रचंड उकाडा वाढलेला होता. व दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना झोडपून काढले .सुमारे तास - दीड तासभर झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते,शेती यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस साठल्याचे दिसून आले.कुठेही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.या पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.