अंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून हे पाणी थेट जलवाहिनीद्वारे कल्याणच्या खाडीत सोडण्याच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे.
अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी परिसरात शेकडो रासायनिक कारखाने असून या कारखान्यांचे सांडपाणी थेट वालधुनी नदी व आसपासच्या नाल्यांमध्ये सोडले जात होते, यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असे या संदर्भात अनेक सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्या होत्या, हे प्रकरण हरित लवादात गेल्यानंतर हरित लवादाने नगरपालिकांना व एमआयडीसी प्रशासनाला ताकीद देऊन दंड आकारणी देखील केली होती.
या प्रकल्पाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमईपीएल व ग्यान मुंबई संयुक्त उपक्रम प्रकल्प प्रभारी जुबेर देशमुख, अंबरनाथ एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील, उपअभियंता सुधीर कुंभार, सहाय्यक अभियंता अनिल साळुंखे यांनी हा प्रकल्प वालधुनी नदी प्रदूषणाच्या मुक्तीकडे पुढचे एक पाऊल असल्याची भावना व्यक्त केली. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून वालधुनी बिरादरीसह अनेक सामाजिक संघटनांनी गेल्या ३ वर्षांपासून पाठपुरावा केला होता, जलप्रदूषणावर मात करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असून लोकांचे आरोग्य, पर्यावरण यांच्या समस्या देखील कमी होतील अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी व्यक्त केली आहे.
कंपन्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण
उल्हासनगर येथील जीन्स कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे वालधुनी प्रदूषित होत असल्याचा आरोप वारंवार होत असल्याने शेवटी उल्हासनगरमधील शेकडो कारखाने स्थलांतरित करण्यात आले आहेत, मध्यंतरी एमआयडीसीच्या प्रत्येक रासायनिक कारखान्यांनी स्वतःची यंत्रणा उभारून रासायनिक पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाण्यात सोडावे, असे आदेश प्रदूषण नियंत्रण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानंतर एक सामूहिक यंत्रणा तयार करण्यात आली असून अंबरनाथ येथे हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. या प्रकल्पात दोन्ही शहरांतील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या सांडपाण्यावर शुद्धीकरण करण्यात येणार आहे व जलवाहिनीद्वारे थेट कल्याणच्या खाडीत सोडण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी १७.५ किमी जलवाहिनी
अंबरनाथच्या जलशुद्धीकरण केंद्रातून थेट कल्याणच्या खाडीत पाणी सोडण्यासाठी १७.५ किमी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी १४० कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. एमआयडीसी प्रशासनातर्फे मोरिवली, चिखलोली एमआयडीसीमध्ये केमिकल पाणी संचय करण्यासाठी मोठ्या टँकची निर्मिती करण्यात आली आहे.