ठाण्यात वामन म्हात्रेंचा निषेध
ठाणे : बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकारसंघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन सकाळी ठाणे शहर दैनिक पत्रकारसंघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत वामन म्हात्रेंवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने तेथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल, अशा अश्लील भाषेत पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केले. या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणा टाळाटाळ करत आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वर्तनाचा व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.