वसई ते भाईंदर प्रवास १० मिनिटांत; रो-रो सेवा अखेर सुरू! सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ

वसईतून मुंबईत रस्तेमार्गाने जायचे म्हटले, तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
वसई ते भाईंदर प्रवास १० मिनिटांत; रो-रो सेवा अखेर सुरू! सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ
Published on

वसई : मागील आठवडाभरापासून विविध तांत्रिक अडचणींत सापडलेली वसई-भाईंदर रो-रो सेवा सरतेशेवटी मंगळवार, २० फेब्रुवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली; तर तत्कालीन जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलवाहतूक सेवा वाढविण्याकरता ‘सागरमाला प्रकल्प’ सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत वसई-भाईंदर रो-रो सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे. सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर’ ही रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार असून, तिच्या चाचणीनंतर रीतसर उद‌्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर, भाजपचे वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील तसेच बविआ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ट्रेनच्या गर्दीत पिचलेल्या वसईकरांना दिलासा देण्यासाठी आता वसई-भाईंदर रो-रो सेवा सुरू झाली असून बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी या सेवेचे लोकार्पण झाले. ही सेवा वसई ते भाईंदर हे अंतर फक्त १० मिनिटांत पूर्ण करणार आहे. २०१७ पासून या सेवेचे काम सुरू होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी उशीर झाला होता. परंतु ही सेवा आता सुरू होत असल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. याआधी घोडबंदर रोडला वळसा घालून भाईंदरला जावे लागत होते. पण आता भाईंदर पश्चिम व दहीसर चेक नाका हा प्रवास या सेवेमुळे सोपा होणार आहे. ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व विद्यमान जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनूवाल यांचे जनतेने आभार मानले आहेत.

वसईतून मुंबईत रस्तेमार्गाने जायचे म्हटले, तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. रेल्वेमार्गाने हेच अंतर कापण्यासाठी २० मिनिटे लागत असली, तरी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वसई-विरारकरांना वाहतुकीसाठी पर्यायी साधन मिळवून देण्यासाठी मुंबई मॅरिटाइम बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या मागणीला यश आलं आणि मंगळवारी या सेवेचा शुभारंभ झाला.

फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असली, तरी वाहतूककोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल.

- मनोज पाटील, भाजप वसई विधानसभा प्रमुख

वसई आणि वसईकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. आता वसईकर वाहतूककोंडी टाळून जलमार्गाने फक्त १० मिनिटांमध्ये आपल्या गाडीसह भाईंदर गाठू शकतील. या सेवेमुळे फक्त वेळच वाचेल असे नाही, तर प्रदूषणही कमी होईल आणि इंधनाची बचत होणार आहे. लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी बहुजन विकास आघाडी कटिबद्ध आहे. हेच ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत.

- आ. क्षितीज ठाकूर, बविआ

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस कंपनीवर जबाबदारी

सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर' रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार आहे. वसई-भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यामार्फत चालविली जाणार आहे. जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली आहे. मात्र जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत.

सकाळी ७.४५ ते सायंकाळी ७.३० पर्यंत सेवा

सध्या वसई-भाईंदर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दी, महामार्गावरील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रो-रो सेवा सुरू झाल्याने येथील प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांतच फेरीबोटीने वसई-भाईंदर असा प्रवास करता येणार आहे. दररोज ही फेरीबोटी सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत दिली जाणार आहे. भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेल्या ०.८ सागरी मैल अंतर असलेल्या मार्गाचा वापर होणार असल्याने प्रवास वेळ कमी लागणार आहे. तर ओहोटीच्या वेळेला सुमारे दोन सागरी मैल अंतराचा मार्ग लागेल, असे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in