गोव्याच्या धर्तीवर उंट, घोड्यांसह 'वसई ख्रिसमस कार्निवल' सर्वधर्म समभाव, संस्कृती-परंपरा संवर्धनासह पर्यावरण बचावचा दिला संदेश

लेझीम पथक, बँड पथक यासह पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झालेले युवक, युवती, महिला,अबाल, वृद्ध सर्वांचे लक्ष खेचून घेत होते.
गोव्याच्या धर्तीवर उंट, घोड्यांसह 'वसई ख्रिसमस कार्निवल' सर्वधर्म समभाव, संस्कृती-परंपरा संवर्धनासह पर्यावरण बचावचा दिला संदेश
PM

वसई : नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर उंट, घोड्यांसह निघालेले 'वसई ख्रिसमस कार्निवल' बघायला सोमवारी सायंकाळी हजारो वसईकर रस्त्यावर आले होते. 'वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक' वसईत निघत असून, २५ डिसेंबर ही तारीख जशी जवळ येते तसे ख्रिसमसबरोबरच या मिरवणूकीचे सर्वांना वेध लागतात. नाताळच्या दिवशी २५ डिसेंबर दुपारी ३ वाजता रमेदीतील घोगळेवाडी येथून कार्निवलचा रमेदी चर्चचे प्रमुख धर्मगुरु एरिक अल्फानंसो यांच्या प्रार्थना अणि आशीर्वादविधीने, तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

सर्वधर्म समभाव, पर्यावरण बचाव हे समाजप्रबोधनाचे थीम घेऊन कार्निवल काढण्यात आले. महाराष्ट्र अणि वसईच्या संस्कृती-परंपरा यांचे जतन, काही सामाजिक देखावे सोबत घेऊन हा कार्निवल यशु जन्माचा देखावा, येशूला भेटीस येत असलेले उंटावर विराजमान तीन राजे, अनेक घोडे अणि त्यांचा लवाजमा यासह निघाला. लेझीम पथक, बँड पथक यासह पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झालेले युवक, युवती, महिला,अबाल, वृद्ध सर्वांचे लक्ष खेचून घेत होते. या कार्निवलची घोगळेवाडी, रमेदी येथून सुरुवात होऊन पुढे होळी मार्गे आक्टन, बंगली, बंगलीहून मधून पापडी नाका गाठून तेथून तामतलाव येथे आल्यावर काही काळ कार्निवल थांबविण्यात आले. यावेळी कार्निवलला अभिवादन करण्यासाठी हजारो वसईकर उपस्थित होते. सर्वांच्या हातातील मोबाईल या आकर्षक कार्निवलची दृश्ये टिपण्यात मग्न झालेले दिसत होते.

बॅसीन कॅथॉलिक बँकेचे रमेदीचे संचालिक ऍलन रॉड्रिग्ज, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष, तथा को.म.सा.प. पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, वसई शाखेचे कार्यवाह संतोष गायकवाड यांनी कार्निवलमध्ये सहभागी होत, संयोजकांचे कौतुक करून उपस्थित जनसमुदायास नाताळच्या शुभेच्छा यावेळी बोलतांना दिल्या. घोगळेवाडी गांव मंडळ अध्यक्ष नेव्हील डिसोजा, कार्निवल मिरवणूकीचे प्रणेते, बँकेचे माजी संचालक सुनील डिमेलो, कर्निवल समितिचे अध्यक्ष रॅन्डोल डिमेलो यांनी कार्निवलचे संयोजन केले. नंतर कार्निवलचा पारनाका (वसई ), मिलागरी क्रॉस मार्गे पुढे जात सायंकाळी ७ वाजता घोगळे गावात पोहचून समारोप झाला. या कार्निवलसाठी बॅसीन कॅथॉलिक बँक आणि वसई -विरार महानगर पत्रकार संघ सहप्रायोजक झाले होते. तर विजय पाटील आणि माजी नगरसेवक जमील शेख यांनीही अर्थसाहाय्य केले.

हजारो वसईकर रस्त्यावर

नाताळचा हर्ष अणि आनंद देणाऱ्या विविध उपक्रमासोबतच जनजागृती, तथा सामाजिक प्रबोधनाचे देखावे आकर्षकरित्या या मिरवणूकीतून पाहायला मिळतात. उंट, घोड्यांसह निघालेले 'वसई ख्रिसमस कार्निवल' बघायला सोमवारी सायंकाळी हजारो वसईकर रस्त्यावर आले होते. या मिरवणुकीला लाभलेले सर्वधर्मीय स्वरूप आणि स्थानिय संस्कृती, परंपरा यांच्या संवर्धनाची जोड यामुळे ती आणखी वैशिष्ट्येपूर्ण होऊन सर्वच वसईकरांसाठी कुतूहल, तसेच औत्सुक्याचा भाग बनली आहे. वसईचा नाताळ म्हटल्यावर आधी त्याचे अनेकाविध वैशिष्ट्ये सांगितले जायचे; मात्र आता सर्वात अग्रभागी उंट, हत्ती आणि घोड्यांच्या सहभागाने भरविला जाणारा हा कार्निवल उपक्रम वसईत लक्षवेधी ठरतो आहे.

logo
marathi.freepressjournal.in