
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना अटक केली. त्यांच्यासोबत बडतर्फ नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता तसेच त्यांचा भाचा अरुण गुप्ता यांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे. नालासोपारातील सरकारच्या ६० एकर जागेवर उभारलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात मनीलाँड्रिंग संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे.
सर्व आरोपींना गुरुवारी मुंबईतील ‘पीएमएलए’ कोर्टात हजर केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चारही आरोपींना वरळीतील ईडी कार्यालयाने चौकशीसाठी समन्स बजावले होते, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ईडीने यासंदर्भात अनेक वेळा छापेमारी केली तसेच आरोपींचे जबाब नोंदवत संबंधित सर्व पुरावे गोळा केले. “सर्व आरोपींची बुधवारी चौकशी केल्यानंतर त्यांचा या आरोपातील सहभाग निश्चित झाला आहे. त्यानंतर ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत त्यांना बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली,” असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.