वसई-विरारमधील वाहतूककोंडी फुटणार; ४ नव्या उड्डाणपुलांना रेल्वेची मंजुरी, पण श्रेयवादाची लढाई सुरू

वसई-विरार परिसरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

वसई : वसई-विरार परिसरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला (General Design) रेल्वे प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे नायगाव ते विरार दरम्यानच्या उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) या दोन्ही पक्षांमध्ये कामाचे श्रेय घेण्यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

सुमारे २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात पूर्व-पश्चिम प्रवासादरम्यान होणारी वाहतूककोंडी ही एक मोठी डोकेदुखी ठरली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हे चार उड्डाणपूल प्रस्तावित करून त्यांचे आराखडे मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठवले होते, जे अनेक दिवसांपासून प्रलंबित होते.

वसई-विरार क्षेत्रातील ४ रेल्वे उड्डाणपूल

  • अलकापुरी-वसई ते नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान

  • ओसवाल नगरी-विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान‬

  • विराट नगर-विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान

  • उमेळमान-वसई ते नायगाव स्थानकादरम्यान‬

भाजपचा पाठपुराव्याचा दावा

भाजपतर्फे पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी या उड्डाणपुलांच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्रव्यवहार करण्यापासून ते पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे म्हटले आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, पश्चिम रेल्वेचे विभागीय अभियंता (पूल) राहुल चौधरी यांनी वसई-विरार महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून चारही उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला मंजुरी दिल्याचे कळवले आहे.

खासदार सवरा आणि आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे वसई-विरार शहर वाहतूककोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. या चार उड्डाणपुलांमुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळेल आणि पूर्व-पश्चिम वाहतूक वेगवान होईल. यापुढील काळात भूसंपादनाचे काम वेगाने करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजन नाईक, आमदार नालासोपारा

हे यश म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी गेल्या १५-२० वर्षांपासून केलेल्या अविरत पाठपुराव्याचे फळ आहे. त्यांनी म्हटले आहे की, या कामासाठी आम्ही केलेले पाठपुरावे जनतेसमोर आहेत. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ एकच गाठ पडावी, तसे एकतर्फी श्रेय कुणालाही घेता येणार नाही. वसई-विरारमधील जनतेला चांगलेच माहीत आहे की, कोणते लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने काम करत होते आणि आजही करत आहेत.

अजीव पाटील, संघटक सचिव बविआ भाजपचा पाठपुराव्याचा दावा

logo
marathi.freepressjournal.in