
अंबरनाथ : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला झाला. १० ते १५ अज्ञात इसमांनी हातात तलवारी घेऊन हा हल्ला करीत कार्यालयाची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेने अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोड, स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी, भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचे कार्यालय आहे.
शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले १० ते १२ अज्ञात हल्लेखोर तलवारी घेऊन कार्यालयात घुसले. आणि त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडून कार्यालयात नासधूस केली. कार्यालयात काम करणाऱ्या क्रिष्णा गुप्ता (२२) या कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण प्लास्टिकचे टेबल पुढे करून त्याने तलवारीचे वार टेबलावर झेलले. सुदैवाने हल्ला झाला. त्यावेळी माजी नगरसेवक रोहित महाडिक आणि त्यांचे वडील कार्यालयात उपस्थित नसल्याने दोघेही थोडक्यात बचावले आहेत. अवघ्या २३ सेकंदात हल्लेखोरांनी कार्यालयाची नासधूस करून घटनास्थळावरून पोबारा केला.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी पोलिसांची तीन विविध तपास पथके तयार करण्यात आली असून उल्हासनगर क्राइम ब्रांचकडून देखील समांतर तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.