Thane : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; महायुतीतील अस्वस्थतेबाबत फाटक-केळकर यांच्यात बंद दाराआड चर्चा

शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजप आमदार संजय केळकर यांची घेतलेली सदिच्छा भेट ही केवळ औपचारिकता नसून महायुतीतील अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Thane : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; महायुतीतील अस्वस्थतेबाबत फाटक-केळकर यांच्यात बंद दाराआड चर्चा
X (@iravindraphatak)
Published on

ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी पडद्यामागील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजप आमदार संजय केळकर यांची घेतलेली सदिच्छा भेट ही केवळ औपचारिकता नसून महायुतीतील अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या मतदारसंघावर सुरुवातीपासून भाजपने दावा केला होता. ठाणे आणि पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे मोठे संख्याबळ असतानाही अखेर ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात नाराजी असल्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते.

आमदार संजय केळकर यांनीही यापूर्वी या जागेवर भाजपचा दावा असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले होते.

राजकीय निरीक्षकांच्या मते, फाटक यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती. निवडणुकीत विजयासाठी शिवसेनेला भाजपच्या स्थानिक प्रतिनिधींच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याने नाराज कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या भेटीद्वारे करण्यात आला असावा.

विशेष म्हणजे रवींद्र फाटक आणि संजय केळकर यांच्यातील राजकीय स्पर्धेचा इतिहासही जुना आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर दोघेही एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. त्यामुळे जुन्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची ही भेट आणि त्यातून दिले गेलेले संदेश यामुळे ठाण्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

युतीधर्म दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे

आमदार संजय केळकर यांनी फाटक यांना शुभेच्छा देताना केलेले वक्तव्य विशेष चर्चेत आले. युतीत एकतर्फी प्रेम चालत नाही. युतीधर्म दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. निर्णय घेताना मित्रपक्षांनाही विश्वासात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाकडे महायुतीतील नाराजीचा अप्रत्यक्ष सूर म्हणून पाहिले जात आहे. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील सुप्त नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, संजय केळकर यांच्या ‘युतीधर्म’च्या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप संबंधांमधील दुरावा पूर्णपणे मिटलेला नसल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहेत. आता या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार केळकर-डावखरेंची अनुपस्थिती

महायुतीच्या जागावाटपात भाजपला माघार घ्यावी लागली आणि शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे सोमवारी फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना भाजपचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरली. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपचे प्रमुख नेते गैरहजर राहिल्याने अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री रवींद्र फाटक यांनी थेट संजय केळकर यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. सुमारे २० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोघांनीही सौजन्यपूर्ण प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी या भेटीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in