भिवंडी तालुक्यातील गावांना एक्स्प्रेस जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार

स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे, मिरा-भाईंदर, भिवंडी महापालिका आणि भिवंडी तालुक्याला २४ गावांना पाणीपुरवठा केला जातो
भिवंडी तालुक्यातील गावांना एक्स्प्रेस जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार

भिवंडी तालुक्यातील २४ गावांना आयआयटीच्या माध्यमातून तयार केलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून गावांना दिलासा मिळणार आहे. तसेच जुन्या जलवाहिन्यांमधून होणारी पाणीगळतीही थांबणार आहे. सुमारे ६३ कोटी रुपयांच्या या कामाच्या दहा दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले आहे.

स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे, मिरा-भाईंदर, भिवंडी महापालिका आणि भिवंडी तालुक्याला २४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. भिवंडीतील गावांसाठी १९९१ मध्ये ३२ दशलक्ष लिटर पाणीकोटा मंजूर केला होता. मात्र, या गावांची लोकसंख्या आता दुपटी-तिपटी वाढली आहे. काल्हेर, शेलार-बोरपाडा, काटई, कारिवली, राहनाळ आदी गावांमध्ये २०११ मध्येच प्रत्येकी दहा ते बारा हजारांपर्यंत लोकसंख्या पोचली. १९९१ पासून २४ गावांची लोकसंख्या ५८ हजार ७५२ वरून २०११ मध्ये १ लाख २६ हजार १३७ पर्यंत पोचली होती. मात्र, पाणी कोट्यात वाढ झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून स्टेम प्राधिकरणाकडे बैठका घेतल्या जात होत्या. त्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे २६ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत या गावांसाठी ८.४९ दशलक्ष लिटर वाढीव पाणीकोटा मंजूर करण्यात आला होता.

त्याचबरोबर स्टेम प्राधिकरणाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ठाण्याचे तत्कालीन महापौर नरेश म्हस्के, स्टेमचे सदस्य व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याबरोबर २१ डिसेंबर २०२० आणि जिल्हाधिकारी कार्यालयात १३ नोव्हेंबर २०२१ रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकांमध्ये पाणीगळती रोखण्यासाठी भिवंडी महापालिका व भिवंडीतील ग्रामीण भागासाठी स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली होती.

या बैठकीतच स्टेमची उदंचन क्षमता व उपांगे ३० वर्षांहून जुनी झाली असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर स्टेम प्राधिकरणाने भिवंडीतील २४ गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला.

स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी आयआयटी, मुंबई यांच्याकडून पाणीपुरवठ्याची वितरण यंत्रणेचा आराखडा निश्चित करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्याचा ६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला स्टेमच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या योजनेनुसार माणकोली ते खारबाव आणि काल्हेर-कशेळीपर्यंत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या संदर्भात येत्या दहा दिवसांत निविदा मागविल्या जाणार आहेत.

भिवंडीच्या ग्रामीण भागासाठी स्वतंत्र जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून एक्स्प्रेस फीडर जलवाहिनी टाकल्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे २४ गावांमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

या निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्टेमच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार मानले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in