बदलापूर : बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे रुळावर ठिय्या मांडला व त्यामुळे या भागातील लोकल वाहतूक जवळपास दिवसभर ठप्प झाली. बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बंद’ पाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर व रेल्वे रुळावर उतरले. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागून शाळेच्या वर्गाची तोडफोड करण्यात आली, तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अखेर संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमाव पांगून परिस्थिती नियंत्रणात आली.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील चार वर्षांच्या चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडूनच अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने शहरात संतापाचे वातावरण होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. तसेच शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि दोन सेविकांचे निलंबन करण्यात आले. तसेच गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे गेले दोन दिवस बदलापूर धुमसत होते. अखेर मंगळवारी बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झाला.
काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक देत शाळेबाहेर पहाटे सहा वाजता आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी पहाटे शाळेबाहेर सुरू झालेल्या आंदोलनात हजारोच्या संख्येने पालक, महिला आणि तरुणवर्ग सहभागी झाला होता, मात्र शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन तास निदर्शने करणाऱ्या आंदोलकांची शाळा प्रशासनाकडून कोणीही भेट न घेतल्याने आंदोलक हिंसक झाले. त्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान आंदोलकांच्या एका चमूने थेट बदलापूर रेल्वे स्थानक गाठत रेल्वे रुळांवर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केल्याने मध्य रेल्वेवरील रेल्वेसेवा ठप्प झाली. आंदोलकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात घोषणा देत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यामुळे शहरात दोन ठिकाणी सुरू असलेले आंदोलन हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरले.
रेल्वे रुळावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तीन तास अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी विनंती करून समजूत घालत होते, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी कुमक मागवत रेल्वे रुळावरील आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी रुळांवरील दगड उचलत पोलिसांवरच दगडफेक केली.
पोलीस, नागरिक जखमी
शाळेबाहेर झालेल्या गर्दीत आणि हिंसक आंदोलनावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक महिलांना भोवळ आली, तर पोलीस अधिकाऱ्यांची टोपी उडवत आंदोलकांनी काही पोलिसांना धक्काबुक्की केल्याचे बोलले जात आहे. यावेळी चेंगराचेंगरीत काही पोलीस आणि आंदोलक जखमी झाले.
उड्डाणपूलही अडवल्याने रस्ते वाहतूक कोलमडली
शाळेपासून जवळच असलेल्या उड्डाणपुलाचा मार्ग सकाळी साडेदहा वाजता आंदोलकांनी अडवत उड्डाणपुलावर टायर जाळले. त्यामुळे पूर्व, पश्चिम आणि स्टेशन परिसरातील रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. एकीकडे रेल्वे वाहतूक बंद असताना शहरातील रिक्षा वाहतूकही बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
रुग्ण, नातेवाईक, कर्मचाऱ्यांचे हाल
सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे ठप्प असल्याने ठाणे, मुंबई येथे उपचारासाठी जाणारे रुग्ण, दाखल रुग्णांच्या नातेवाईकांची अडचण झाली होती, तर शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याने अनेक ऑफिसेस, कंपन्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी कार्यालयात आलेल्या नागरिकांना परतीची सोयच नसल्याने कर्मचाऱ्यांना दिवसभर शहरात आणि रेल्वे स्थानकावर ताटकळत राहावे लागले होते.
आंदोलकांच्या रोषानंतर लोकप्रतिनिधींचा काढता पाय
कोणताही राजकीय चेहरा नसलेल्या आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या या आंदोलनापासून शहरातील लोकप्रतिनिधींनी स्वत:ला दूर ठेवले होते. काही लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याला सामोरे जावे लागल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन स्थळाहून काढता पाय घेतला.
‘लाडकी बहीण’ नको ‘सुरक्षित बहीण’ हवी
यावेळी आंदोलकांकडून हातात फलक घेत राज्य शासनाकडून आम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेची गरज नसून ‘सुरक्षित बहीण’ योजना राबवून महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी आक्रमक महिला आंदोलकांकडून करण्यात येत होती.
अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला. ॲड. जयेश वाणी यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हे प्रकरण कसे उजेडात आले, याचा तपशील जाहीर केला आहे. ॲड. जयेश वाणी आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत.” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचे. आईने दवाखान्यात नेल्यावर कळले की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा”ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचे बळी बनवले.
आरोपी ‘हिस्ट्री शिटर’
आरोपी हा ‘हिस्ट्री शिटर’ असल्याची माहिती मिळत असून, तरीही त्याला संस्थेत कामाला का ठेवण्यात आले? असा सवाल करण्यात येत आहे. बदलापूरच्या या शाळेचे नाव आदर्श विद्यालय असून शाळेचे ट्रस्टी भाजपचे पदाधिकारी असल्याने प्रारंभी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश
हे संवेदनशील प्रकरण असल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा चालवला जाईल. तसेच संबंधित शाळेचे संस्थाचालकांची चौकशी करत त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गिरीश महाजनांची मनधरणी निष्फळ
आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने आंदोलकांची पाऊण तास मनधरणी केली. परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अखेर महाजन यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
‘रेल रोको’मुळे लोकल सेवा ठप्प
बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून ‘रेल रोको’ केल्याने बदलापूर ते कर्जत/खोपोली मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. रेल रोकोमुळे या मार्गावरील ३० हून अधिक लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या. तर मेल/एक्स्प्रेस ठाणे, दिवा, पनवेलमार्गे सीएसएमटी येथे दाखल करण्यात आल्या. तर अंबरनाथ-सीएसएमटीदरम्यान लोकल सुरळीत सुरू होत्या. सकाळी ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास नागरिक रेल्वे रुळावर उतरले. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे १२ मेल-एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान, कल्याण ते कर्जत स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५५ बस चालविण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
तब्बल १० तासांनी लोकल सुरू
बदलापूरमधील ‘रेल रोको’मुळे दिवसभर ठप्प झालेली बदलापूर-कर्जत, खोपोली लोकल सुमारे १० तासांनी सुरू करण्यात आली. सकाळी ठप्प झालेली वाहतूक रात्रीपर्यंत बंद होती. बदलापूर आणि कर्जत/खोपोली दरम्यान लोकल सेवा रात्री ८.०५ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. याआधी हलके इंजिन या मार्गावरून चालवून, रेल्वे मार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करून लोकल सेवा सुरू केली.
आंदोलक हिंसक बनले
हिंसक झालेल्या शेकडो महिला, पुरुष आंदोलकांनी सुरुवातीला पोलिसांवर बांगड्या, बाटल्या आणि चपला फेकल्या. तसेच पोलिसांना न जुमानता शाळेचे प्रवेशद्वार ओलांडून शाळेतील कार्यालयांची आणि वर्गांची तोडफोड केली. पोलिसांनी जादा कुमक मागवली व शाळेबाहेर अश्रुधुराचा वापर केला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
राजकीय पडसाद
फास्ट ट्रॅक खटला चालवणार - फडणवीस
लाडकी बहीणच नाही तर मुलीही असुरक्षित - उद्धव ठाकरे
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
मनसैनिकांनी आरोपीला शिक्षा होईपर्यंत मागे हटू नये - राज ठाकरे
खटला फास्ट ट्रॅक चालवून आरोपींना फाशी द्यावी - वडेट्टीवार
सर्व शाळांमध्ये विशाखा समित्या
कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन करण्यात येईल. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. या प्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही चालू अवस्थेत नसल्याचे आढळले आहे. त्यावरही कारवाई होईल, असे ते म्हणाले.
एसआयटी गठित करण्याचे आदेश
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ गठित करण्याचे आदेश दिले.
घटनाक्रम
बदलापुरात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची दिरंगाई
आरोपी, संस्थाचालकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न
शाळेतील सीसीटीव्ही बंद
आरोपीला अटक
मुख्याध्यापिकेसह चार जणांचे निलंबन
मंगळवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन
संतप्त जमावाची शाळेत घुसून तोडफोड
जमावावर पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुराचा मारा
बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन
मंत्री गिरीश महाजनांचे आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न
रेल्वे वाहतूक दहा तास विस्कळीत
तीसहून अधिक लोकल रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या
रेल्वे वाहतूक रात्री ८.०५ वाजता पूर्ववत
तीन पोलीस अधिकारी निलंबित
बदलापूरमधील घटनेनंतर पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.